अपहरण करून खासगी हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षकाला भाजपा नगरसेवकाकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 01:57 PM2020-05-14T13:57:33+5:302020-05-14T13:58:15+5:30
अहमदनगर: खासगी हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षकाचे अपहरण करून त्याला महापालिकेत नेऊन मारहाण केल्याप्रकरणी भाजपचा नगरसेवक व सभागृहनेता स्वप्नील शिंदे याच्यासह भैय्या संपत गोरे व इतर तिघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १३) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर: खासगी हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षकाचे अपहरण करून त्याला महापालिकेत नेऊन मारहाण केल्याप्रकरणी भाजपचा नगरसेवक व सभागृहनेता स्वप्नील शिंदे याच्यासह भैय्या संपत गोरे व इतर तिघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १३) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नगर शहरातील साईदीप हॉस्पिटलमधील सुरक्षारक्षक संजय परशुराम छत्तीसे (वय ४२ रा. रुईछत्तीसी ता. नगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. ६ मे रोजी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. छत्तीसे हे ६ मे रोजी दुपारी तीन वाजता साईदीप हॉस्पिटल येथे सहाव्या मजल्यावर काम करीत असताना तीन अनोळखी व्यक्ती लिफ्टने त्यांच्याजवळ आले. यावेळी छत्तीसे यांच्या नावाची विचारणा करून तू आमचे बरोबर चल, नगरसेवक स्वप्नील शिंदे यांनी बोलविले आहे, असे त्यांना सांगितले असता छत्तीसे यांनी त्यांना मी येणार नाही मला काम आहे असे सांगितले. यावेळी त्या तिघांनी छत्तीसे याना बळजबरीने स्कॉर्पिओ गाडीत बसवून ती गाडी महानगरपालिका येथे आणून फियार्दीस गाडीतून उतरविले.
नगर शहरातील महानगरपालिका येथे पहिल्या मजल्यावर स्वप्नील शिंदे यांच्या दालनामध्ये नेले. शिंदे व इतरांनी फिर्यादीच्या कानाखाली, पाठीवर लाथाबक्क्यांनी मारहाण केली. भैय्या संपत गोरे याची पाईपलाईन शेतातून जाऊं दे, त्यास विरोध करू नको. जर विरोध केला तर तुझे हात पाय काढून घरी बसवू असा त्याला दम दिला. आॅफिसमध्ये बाजूला बसलेल्या लोकांना ‘पहाता काय रे याचे तंगडे तोडा’ असा दम दिला. तसेच फिर्यादिला मारण्यासाठी चिथावणी दिली. त्यावेळी छत्तीसे यांनी शिंदे यांना सोडवण्यासाठी विनवणी केल्यानंतर शिंदे व त्यांचे माणसाकडून छत्तीसे याना पुन्हा काळ््या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत बसवून पुन्हा साईदीप हॉस्पिटल येथे सोडून दिले, असे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सोनवणे हे करत आहेत.
...........
सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर गुन्हा दाखल
छत्तीसे हे पोलिस स्टेशनला तक्रार घेऊन गेले होते. गेल्या आठवड्यात मारहाण झाली होती. परंतु पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. छत्तीसे यांचे वडील माजी पोलिस अधिकारी आहेत. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी होती. त्यामुळे छत्तीसे यांनी थेट पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. पोलीस अधीक्षकांनी तोफखाना पोलिस स्टेशनला तक्रार अर्जाची चौकशी करण्यास सांगितले. पोलिसांनी हास्पिटल व महानगरपालिकेची सीसीटीव्ही कॅमेरे यांचे फुटेज तपासले. त्यामधे काळ्या रंगाच्या स्कोर्पिओमधून छत्तीसे यांना महानगरपालिका व हास्पिटलमध्ये घेऊन जाताना व परत आणून सोडताना दिसत आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.