१४ कोटी रुपयांचा अपहार : श्रीरामपूरच्या तत्कालीन नगराध्यक्षा राजश्री ससाणेंसह ७ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 03:58 PM2019-08-22T15:58:57+5:302019-08-22T15:59:06+5:30
२०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये पालिकेने भुयारी गटार योजनेसाठी शहरातील दक्षिण भागातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध नसताना बिले अदा केली
श्रीरामपूर : शहरातील भुयारी गटार योजनेतील सांडपाणी प्रकल्पात सुमारे १४ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्यासह दोन मुख्याधिकाऱ्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरया फौंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राजश्री ससाणे (तत्कालीन नगराध्यक्ष), गणपतराव मोरे (तत्कालीन मुख्याधिकारी), संतोष महादेव खांडेकर (तत्कालीन मुख्याधिकारी), सूर्यकांत मोहन गवळी (बांधकाम अभियंता), राजेंद्र विजय सुतावणे (तत्कालीन बांधकाम अभियंता), ठेकेदार संस्था लक्ष्मी सिव्हील इंजिनियरींग (कोल्हापूर) व दशसहस्त्र सोल्युशन (ठाणे) यांचा समावेश आहे.
२०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये पालिकेने भुयारी गटार योजनेसाठी शहरातील दक्षिण भागातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध नसताना बिले अदा केली. उत्तरेतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच आवश्यक असणाºया यांत्रिकी व विजेच्या कामाची बिले अदा केली. नागरिक व सरकारची फसवणूक करुन खोटे व बनावट बिले बनवून सुमारे १३ कोटी ९३ लाख ८४ हजार ९५४ रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद खोरे यांनी दिली आहे. पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करत आहेत.