औरंगाबादेतील विवाहितेशी लग्न करण्यासाठी मुलाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:15 AM2021-06-11T04:15:00+5:302021-06-11T04:15:00+5:30
श्रीगोंदा (अहमदनगर) : औरंगाबाद येथील एका विवाहित महिलेने आपल्याशीच लग्न करावे यासाठी तिच्या सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून कारमधून ...
श्रीगोंदा (अहमदनगर) : औरंगाबाद येथील एका विवाहित महिलेने आपल्याशीच लग्न करावे यासाठी तिच्या सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून कारमधून घेऊन चाललेल्या एका व्यक्तीला श्रीगोंदा पोलिसांनी नगर-दौंड रस्त्यावरील पारगाव फाटा येथे बुधवारी (दि.९) सायंकाळी ७च्या सुमारास अटक केली. मुलाची त्याच्या ताब्यातून सुटका करून त्याला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
सागर गोरख आळेकर (रा. श्रीगोंदा) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर आळेकर याच्या विरोधात वाळूंज (औरंगाबाद) एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संबंधित महिलेचे व आळेकर याचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे तिने आपल्याशीच लग्न करावे, यासाठी आळेकरने बुधवारी सकाळी औरंगाबाद गाठले. तेथे त्याने मुलाच्या वडिलांना धमकावले. औरंगाबादच्या बजाजनगर येथून मुलाचे अपहरण केले. त्या मुलाला कारमध्ये घालून नगरच्या दिशेने निघाला. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी तत्काळ आरोपीच्या गावाचा विचार करून नगर व श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मुलाचे अपहरण झाल्याची माहिती दिली.
त्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले यांनीही तत्काळ या प्रकाराची दखल घेतली. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्यासह पोलीस काॅन्स्टेबल रमेश जाधव, अंकुश ढवळे, किरण बोराडे, दादा टाके, प्रकाश मांडगे गोकूळ इंगवले यांचे पथक नगर-दाैंड रस्त्यावरील पारगाव फाटा येथे पाठविले. तेथे नाकाबंदी करण्यात आली. तेथेच सायंकाळी सातच्या सुमारास सागर आळेकर याला पकडले. त्याची कार जप्त करून अपहरण झालेल्या मुलाची सुटका केली. त्या मुलाला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.