शेतक-याची मुलं पीएसआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 02:06 PM2018-09-11T14:06:54+5:302018-09-11T14:07:57+5:30

पारनेर तालुक्याची दुष्काळी तालुका अशीही ओळख. याशिवाय राज्याला व देशाला शिक्षक पुरवणारा तालुका म्हणून ओळखला जायचा.

Kids of farmer PSI | शेतक-याची मुलं पीएसआय

शेतक-याची मुलं पीएसआय

पारनेर तालुक्याची दुष्काळी तालुका अशीही ओळख. याशिवाय राज्याला व देशाला शिक्षक पुरवणारा तालुका म्हणून ओळखला जायचा. आता राज्याला व देशाला सर्वाधिक आय.ए़.स़ , पोलीस अधिकारी, उपजिल्हाधिकारी व पोलीस उपनिरीक्षक देणारा तालुका म्हणूनही ओळख निर्माण होत आहे़ मागील दोन-तीन वर्षात सुमारे आठ ते दहा जणांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे़ त्यांचा जाणून घेतलेला हा प्रवास....


स्वाती लामखडे
पारनेर तालुक्यातील निघोज येथील भूमिपुत्र स्वाती बाळासाहेब लामखडे. सध्या बीड जिल्ह्यात तिचे नाव गाजत आहे़ आष्टी येथे पोलीस उपनिरीक्षक दामिनी पथकाचे काम करत असताना शाळा, महाविद्यालयात मुलींची छेड काढणाऱ्या, त्यांना त्रास देणाºया टुकारांचा बंदोबस्त करण्याची मोहीम दामिनी पथकाच्या माध्यमातून स्वाती हिने केली़ स्वाती ही निघोजचे शेतकरी कुटुंब बाळासाहेब व निला लामखडे यांची मुलगी़ बारावीपर्यंत निघोजच्या मुलिकादेवी विद्यालयात शिक्षण झाल्यावर डी़एडक़ेले़ डी ़एड़ नंतर वर्षभर घरीच बसणाºया स्वातीला तिचा लहान भाऊ प्रवीण याने घरी बसून काय करणार, तू अधिकारी बन, असा तगादा लावला़ स्वातीनेही मग मागे वळून पाहिले नाही. अधिकारी बनण्याचा ध्यास घेतला़ पुण्यात जाऊन अभ्यास केला़ २०१२ मध्ये एम़पी़एस़सी़ची परीक्षा दिली. या परीक्षेतून तिची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली़ २०१७ मध्ये पारनेर येथील मयुर नवले याच्याबरोबर विवाहबंधनात ती अडकली.

सविता काळे
अस्तगाव येथील शेतकरी कुटुंब गोरख व अनुसुया यांची कन्या सविता काळे़ अस्तगाव सारख्या दुष्काळी गावात शेतीबरोबर दुग्धव्यवसाय करून गोरख यांनी कुटुंबाला उभारी दिली़ मोठी मुलगी कविता पुण्यात बँकेत उच्च पदावर आहे तर मुलगाही चांगली नोकरी करतो़ लहान मुलगी सविता हिने प्रथमपासून पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले़ जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन सविताने बारावी शास्त्र सारोळा कासार येथे पूर्ण केले़ पारनेर महाविद्यालयात बी़एस्सी पूर्ण केल्यानंतर स्पेशल विषय प्राणीशास्त्र घेण्यासाठी नगर गाठले़ तेथे शिक्षण सुरू असतानाच मामा ज्ञानदेव भोसले व नामदेव भोसले व आजी सत्यभामा काळे यांनी सविताला अधिकारी बनण्यासाठी शैक्षणिक आधार दिला़ त्यांचे बळ मिळाल्यावर सविताने २०१६ मध्ये प्रथमच परीक्षा दिली. या पहिल्याच प्रयत्नामध्ये स्वातीने अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

नवनाथ रसाळ
निघोज येथील नवनाथ आनंदा रसाळ याचे वडील आनंदा व आई सरसाबाई,भाऊ किरण, बहीण गीता व भिमा असे कुटुंब़ नवनाथने बारावीपर्यंत निघोज येथील मुलिकादेवी विद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर पारनेर महाविद्यालयात बीक़ॉमक़ेले़ नंतर एम.कॉमक़ेले़ दहावीच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात पोलीस अधिकारी आले होते़ तेव्हापासून पोलीस बनण्याचे ध्येय ठेवले़ गावातीलच पोलीस उपनिरीक्षक झालेले योगेश लामखडे यांचे मार्गदर्शन घेतले़ पोलीस अधिकारी बनण्याचा ध्यास घेतला़ पुणे विद्यापीठात शिक्षण घेताना जयकर ग्रंथालयात अभ्यास केला़ कमवा व शिका योजनेत सहभाग घेऊन इतर येणारा खर्च भागवण्यास मदत झाल्याचे नवनाथ सांगत होता़ नंतर फेबु्रवारी २०१४ मध्ये एम़पी़एस़सी़ची परीक्षा दिली़ आणि त्यात पास होऊन नवनाथ पोलीस उपनिरीक्षक झाले़ सध्या धुळे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्य करताना नवनाथ यांनी डिजेच्या दणदणाटाविरोधात मोहीम उघडली आहे़ ही मोहीम सर्वसामान्य माणसांना चांगलीच भावली आहे़

किरण पठारे
पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील सुरेश व मंगल पठारे यांचा मुलगा किरण . वडील सुरेश पठारे पारनेर पंचायत समितीचे निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी. भाऊ वैभव शिक्षक, दुसरा भाऊ अभय -इंजिनीअर असे हे कुटुंब़ किरणने पारनेर येथे बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुणे विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण केंद्रातून बी़ए़ पूर्ण केले़ एम़पी़एस़सी़चा अभ्यास सुरू ठेवला़ पुणे विद्यापीठात वसतीगृहात राहून एम़ए़ पूर्ण केले़ २०११ मध्ये पोलीस उपनिरीक्षकाच्या जागा सुटल्यावर किरणने अर्ज भरला़ किरण पहिल्याच प्रयत्नात भरती झाला़ अत्यंत शिस्तबध्द व नियमात वागणारा तरूण म्हणून किरण याची ओळख आहे़ पारनेर येथील नागेश्वर मित्र मंडळाच्या प्रत्येक सामाजिक कार्यात त्याचा सहभाग असतो़ २०१२ मध्ये प्रशिक्षण झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात त्याची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेमणूक झाली़ किरण याने नांदेड जिल्ह्यात अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपींना पकडून त्यांना कडक शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केलेच़ शिवाय विविध सामाजिक विषयांवर शाळा, महाविद्यालये व सामान्य जनतेत जनजागृती करण्याचे कामही किरण सध्या करीत आहे़ पत्नी अर्चना या सुध्दा नांदेड येथील विविध सामाजिक कामामध्ये किरण यांना साथ देत आहे़

दीपाली घोगरे
दीपाली बबन घोगरे हिचे निघोज जवळील शिरसुले हे छोटे गाव़ आई शोभा अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत़ तर वडील बबन हे शेतकरी़ थोडीफार शेती कुकडी कालव्याजवळ असल्याने कुटुंबाला आर्थिक आधार होता़ आई- वडिलांनी कष्ट करून मोठी मुलगी पुष्पा, खंडु, योगेश, निलेश व दीपाली यांना चांगले शिकवले़ ते सध्या वेगवेगळया बँकांमध्ये कार्यरत आहेत़ दीपाली हिने मुलिकादेवी विद्यालयातून बारावी शास्त्र मध्ये पास झाल्यानंतर तळेगाव दाभाडे येथे बीएस्सी अ‍ॅग्री केले़ त्याच दरम्यान तिने पुणे येथे भगीरथ संस्थेत काही प्रमाणात स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन घेतले़ २०१४ मध्ये एम़पी़एस़सी़ची पूर्व परीक्षा दिल्यानंतर मुख्य परीक्षेत तिला यश मिळाले नाही़ तरीपण तिने जिद्द सोडली नाही, आणि अभ्यास करीत परीक्षा देत राहिली. पुण्यात एका कृषी कंपनीत कार्यरत राहून अभ्यास केला. २०१६ च्या एम़पी़एस़सी़ परीक्षेत तिला यश मिळाले आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणून तिची निवड झाली़ आणखी अधिकारी पदे तिला खुणावत आहेत.

.. विनोद गोळे 

Web Title: Kids of farmer PSI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.