डल्ला मारणा-यांना हल्लाबोलचा अधिकार नाही -भानुदास बेरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:22 PM2018-02-13T15:22:43+5:302018-02-13T15:23:00+5:30
आघाडीच्या काळात पाटबांधारे, वीज, टँकर घोटाळा करुन सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोलची भाषा करत आहेत़ त्यांनी जनावरांचा चारासुद्धा सोडला नाही. त्यामुळे जनता त्यांना रस्त्यावरच धडा शिकवेल, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केली.
अहमदनगर : आघाडीच्या काळात पाटबांधारे, वीज, टँकर घोटाळा करुन सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोलची भाषा करत आहेत. त्यांनी जनावरांचा चारासुद्धा सोडला नाही. त्यामुळे जनता त्यांना रस्त्यावरच धडा शिकवेल, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केली.
नगर जिल्ह्यातील सन २०१२-१३ व २०१३-१४ या काळातील ४२६ छावण्यातील जनावरांचा चारा घोटाळा उघड झाल्याने राष्ट्रवादीचे दाखवायचे दात वेगळे अन् खायचे दात वेगळे हे जनते समोर आले आहे. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्यांनी जनतेला नैतिकता शिकविण्याची गरज नाही. सरकारच्या काळात केलेले घोटाळे पुन्हा बाहेर येऊ नये म्हणून आंदोलनाचे हत्यार वापरुन रस्त्यावर उतरण्याची भाषा सुरु केली आहे. आघाडी सरकारच्या काळामध्ये काँग्रेस अंतर्गत संघर्ष याच जनतेने पाहिला आहे. सर्वसामान्यांना वेठिस धरण्याचे काम यांच्याच काळात झालेली आहे. टँकरमुक्त घोषणा हवेत विरली. उलट पक्षी अनेक ठिकाणी, टँकर घोटाळे बाहेर आले. २०१२-१३ व २०१३-१४ साली यांनीच जनावरांच्या छावण्या वाटल्या. पण चारा घोटाळा उघड झाल्यावर यामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला, हे जनतेसमोर आले आहे. यांच्याच काळात ‘लुना’ दुचाकीवर पंधरा टन चारा आणल्याची उदाहरणे आजही शासकीय रेकॉर्डवर उपलब्ध आहेत. यांनी जित्रांबांचा चारा सुद्धा सोडला नाही. जनसामान्यांचा कळवळा घेऊन आम्हीच त्यांचे कैवारी आहोत, असा केविलवाणा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केला आहे. विदर्भात हल्लाबोल आंदोलनास सुरुवात झाली. तिथे प्रतिसाद कमी मिळाल्यामुळे आता महाराष्ट्रभर आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी शासनामुळे अन् व्हिआयपी संस्कृतीला फाटा देत सामान्य घटकांना थेट लाभ देणारे सरकार जनतेला आपलेसे वाटत आहे. त्यामुळे विरोधकांना कुठलेच मुद्दे सरकार विरोधात शिल्लक राहिले नसल्यामुळेच हल्लाबोलची नौटंकी सुरु केल्याचा आरोप बेरड यांनी केला.