हिरण यांची हत्या हे गृह विभागाचे अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:22 AM2021-03-09T04:22:25+5:302021-03-09T04:22:25+5:30
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येवरून विधानसभेत भारतीय जनता पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर ...
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येवरून विधानसभेत भारतीय जनता पक्षाने सरकारला चांगलेच धारेवर धरले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनीही गृह विभागाच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवत हिरण यांची हत्या हे गृह विभागचे अपयश असून, या घटनेवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने निवेदन सादर करण्याची मागणी केली.
अधिवेशनात दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी हिरण यांच्या हत्येचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी यावेळी घटनेचा काही तपशील मांडला. सोमवारी विखे यांनी गृह खात्याचे सरकारवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. पोलीस सामान्यांवर धाक दाखवत आहेत. मात्र गुंड मोकाट फिरत असल्याचे ते म्हणाले.
पोलिसांच्या कामगिरीवर आमचा आक्षेप नाही. मात्र मूठभर लोकांमुळे गृह खाते बदनाम होत आहे. हिरण यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. आता मागे जाता येणार नाही. मात्र पुढील काळात अशा प्रकारची कोणतीही घटना घडता कामा नये याची खबरदारी घेतली जावी, असे विखे म्हणाले.
..........
हिरण स्वातंत्र्यसैनिक कुटुंबातील
हिरण यांचे अपहरण झाल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाला व्यापाऱ्यांनी सर्व माहिती दिली होती. जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देण्यात आले होते. परंतु त्याबाबत गांभीर्य दाखविले गेले नाही. हिरण यांचे वडील स्वातंत्र्यसेनानी होते. त्यामुळे अशा कुटुंबातील व्यक्तीची हत्या खेदनजनक आहे. या प्रकरणाचा तातडीने छडा लावावा. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर निवेदन सादर करावे, अशी मागणी अशी विखे यांनी केली.