रयतेचा राजा - यशवंतराव भांगरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:09 AM2021-01-24T04:09:56+5:302021-01-24T04:09:56+5:30
अकोले तालुक्यात १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यातील अनेक स्वातंत्र्य सेनानी या सह्याद्रीच्या कुशीत भूमिगत राहून देशासाठी त्यागाचा व समर्पणाचा इतिहास ...
अकोले तालुक्यात १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यातील अनेक स्वातंत्र्य सेनानी या सह्याद्रीच्या कुशीत भूमिगत राहून देशासाठी त्यागाचा व समर्पणाचा इतिहास याच परिसरात त्यांनी निर्माण केला. यातील शीर्षस्थ म्हणून अच्युतराव व रावसाहेब पटवर्धन यांच्यासारख्या अत्युच्य राष्ट्रीय नेत्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही पवित्र भूमी म्हणूनही अकोले तालुकावासीयांना निश्चितच अभिमान वाटणारी आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५२ साली झाली. अकोले तालुका हा आदिवासीबहुल लोकसंख्येचा असल्याने या तालुक्यातील विधानसभेची जागा ‘आदिवासी’ समाजासाठी राखीव होती. या जागेवर भांगरे परिवारातील गोपाळराव भांगरे हे काँग्रेस पक्षाच्यावतीने उमेदवार म्हणून उभे राहिले व ‘आमदार’ म्हणून निवडून आले. या भागात घडलेला स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास व महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च प्रतिनिधीगृहात लोकप्रतिनिधीत्व करण्याचे मिळालेले भाग्य ही सर्व पार्श्वभूमी यशवंतराव भांगे यांच्या सामाजिक राजकीय जडणघडणीला पूरक ठरली. पुढे १९५७ च्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘मुंबई’ महाराष्ट्राला मिळावी म्हणून ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र’ झालाच पाहिजे, या मागणीसाठी सर्व डाव्या पक्षांच्या एकजुटीखाली संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन होऊन काँग्रेसच्या विरुद्ध निवडणूक झाली. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत लोकप्रतिनिधीत्वाचा मान मिळविणारे गोपाळराव भांगरे हे ऐन निवडणुकीच्या काळातच हृदयविकाराच्या धक्क्याने काळाच्या पडद्याआड गेले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या झंजावातात प्रजा समाजवादी पक्षाचे नारायणराव नवाळी आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या निवडीने मध्ये खंडित झालेली लोकप्रतिनिधीत्वाची परंपरा पुनर्स्थापित झाली. अत्यंत प्रेमळ व लाघवी स्वभाव ही त्यांना लाभलेली नैसर्गिक देणगी होती. गोरगरिबांच्या प्रति असलेली त्यांची तालुक्यातील सर्व जनतेच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेला जनतेचा राजा म्हणून त्यांनी आपले स्थान निर्माण केले. जनतेला प्रेम देताना जात, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत असा कुठलाही भेदभाव अंतर्मनातसुद्धा येऊ दिला नाही. १९७२ साली संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ होता. कळसूबाईच्या पायथ्याशी ब्रिटिश काळातच भंडारदरा धरण बांधून त्याचे पाणी त्यावेळचा श्रीरामपूर तालुका, कोपरगाव, राहुरी या तालुक्यांमध्ये शेतीसाठी दिले जात होते. दुष्काळाच्या परिस्थितीने होरपळत असताना अमृतेश्वर येथे उगम पावलेल्या प्रवरा नदीवर बांधलेल्या या धरणाचे पाणी आपल्या भागातून वाहून जाताना पहात असताना ते पाणी जमिनीला घेण्यासाठी मात्र गोरगरीब शेतकऱ्यांना कुठलाही अधिकारी नव्हता. शेतकऱ्यांची ही अगतिक अवस्था पाहून दुष्काळी वर्ष संपल्यावर मी (दशरथ सावंत), लक्ष्मण शिंदे व डॉ.बी.जी. बंगाळ अशा तिघांनी विचार विनिमय करून रूंभोडी येथे दुसऱ्याच वर्षी म्हणजे १९७३ साली जनता परिषद घेण्याचे ठरविले. या जनता परिषदेसाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार यशवंतराव भांगरे यांना निमंत्रित केले. ही परिषद प्रवरेचे पाणी नदी काठावरील दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना मिळावे, तसेच प्रस्तावित म्हाळादेवी धरण म्हाळादेवी या जागेवरून न करता ते दिगंबर येथे बांधावे, या दोन मागण्यांसाठी आयोजित केली होती. या परिषदेत भाषण करताना आमदार यशवंतराव भांगरे म्हणाले की, आमच्या तालुक्यात उगम पावलेल्या प्रवरा नदीवर आमच्याच तालुक्यातील गरीब आदिवासींची जमीन बुडवून बांधलेल्या धरणातून वाहणाऱ्या पाण्यावर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचा नैसर्गिक हक्क असताना आतापर्यंत आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवले, हा अन्याय यापुढे आम्ही सहन करू शकणार नाही. यापुढे जर हे पाणी आम्हाला मिळाले नाही तर अकोले तालुक्यातील जनतेच्या रक्ताचे पाट वाहतील, हे सरकारने ध्यानात घ्यावे. अत्यंत विनम्र, सोज्वळ, सहनशील व मृदुस्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले आमदार यशवंतराव भांगरे यांच्या तोंडून रक्ताचे पाट वाहण्याची आग ओकणारी भाषा ऐकून त्यांच्यातील एका वेगळ्या अशा उग्र रूपाचे दर्शन या परिषदेत त्यांनी जनतेला घडविले होते. या दोन्हीही मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी या परिषदेत यशवंतराव भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. त्या समितीत तत्कालीन सभापती मधुकरराव पिचड यांचाही समावेश होता. मी, लक्ष्मण शिंदे व डॉ.बंगाळ आम्हीही होतो. आम्ही सर्वांनी मुंबईला जावून मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना मुंबईला मंत्रालयात त्यावेळी पाटबंधारे मंत्री असलेले वसंतदादा पाटील यांच्या समवेत भेटलो. शेतकऱ्यांच्यावतीने मागण्यांचे निवदेन दिले. त्या निवेदनात परिषदेतल्या भावनांची तीव्रता नमूद करून मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. पुढे १९७५ साली इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावल्यामुळे आंदोलनाचे सर्व अधिकार नष्ट झाले होते. मी स्वत:ही नाशिक कारागृहात स्थानबद्ध होतो. या सर्व प्रकारच्या बंदीच्या (आणीबाणीच्या) काळात शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. पाटबंधारे मंत्री खताळ पाटील होते. त्यांनी शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते म्हाळादेवी या जागेवरील प्रस्तावित धरणाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम करून धरणाच्या कामाला सुरुवात केली होती. मी कारागृहातून मुक्त झाल्यानंतर या धरणाचे काम बंद करून धरणग्रस्तांचे आंदोलन करून धरणाची जागा बदलली; परंतु प्रवरेच्या पाण्याचे निर्णायक आंदोलनासाठी पुन्हा काही वर्षे गेली असली तरी रूंभोडी येथील जनता परिषदेत यशवंतराव भांगरे यांनी अकोले तालुक्यातील जनतेला जर पाणी मिळाले नाही तर रक्ताचे पाट वाहतील, हा जो इशारा पाणी व धरणाची जागा बदल हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दिला होता. ते उद्दिष्ट त्यांच्या हयातीनंतर जरी साध्या झाले असले तरी त्या परिषदेतील त्यांच्या इशाऱ्याने या दोन्ही मागण्यांच्या यशस्वी लढ्याची पायाभरणी झाली होती. हे उदाहरण यासाठी की ते वरवर पहाता अत्यंत सौजन्यशील, मृदू स्वभावाचे दिसत असले तरी तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण। वज्रास भेदू ऐसे।’ किंवा ‘भले तरी देऊ
कासेची
लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।’ याप्रमाणे ते प्रसंगी उग्ररूपसुद्धा कसे धारण करीत होते, हे त्याप्रसंगी उफाळून आलेले त्यांचे रूप मला त्यांच्या आयुष्यात फारच दुर्मीळ असे पाहाण्यास मिळाले. जनहिताच्या कळवळ्यातून अकोले तालुक्यातील अकोले तालुका सहकारी दूध संघ, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था, अगस्ती सहकारी साखर कारखाना, शिक्षण संस्थेतून महाविद्यालय, या सर्व संस्थांच्या स्थापनेत त्यांच्या वाढीत व यशस्वीतेत त्यांनी फार मोठे योगदान दिलेले आहे. ते काँग्रेस पक्षाचे व मी प्रजा समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता. मी व आमच्या पक्षाचे नेते हे काँग्रेस पक्ष व त्यांच्या नेत्या कार्यकर्त्यांकडे अत्यंत कडव्या नजरेने पहात होतो; परंतु त्याला प्रत्युत्तर म्हणून यशवंतराव भांगरे यांनी मात्र कधीच माझ्याकडे व इतरही कम्युनिष्ट किंवा इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांकडे चुकूनही पाहिले नाही. याचा अनुभव मला तरी आला असल्याने हे मुद्दाम नमूद केले पाहिजे. आपल्याला कुणी शत्रू मानले तरी मी त्याला मित्रच मानील, हे कमालीचे औदार्य या व्यक्तीमध्ये होते हे मी अनुभवलेले आहे. तालुक्यातील काँग्रेसेतर सर्वच कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेस पक्ष व कार्यकर्त्यांच्या विरोधी कडवेपणाने विरोध करण्याचे राजकारणात मीसुद्धा अग्रभागी असायचो, तरीसुद्धा मुंबईला एकदा मुक्काम करण्याची पाळी आली तेव्हा मी त्यांच्या आमदार निवासाच्या खोलीचा शोध घेत गेलो. तेव्हा ते तिथेच मुक्कामाला होते. मी मुक्कामाचा इरादा बोलून दाखविला तेव्हा ते म्हणाले ‘अरे! ही खोली तुमचीच आहे, असे समजून मी नसतानासुद्धा कधीही येऊन माझ्या खोलीची चावी तुम्ही घेऊन मुक्काम करीत जा’, असे मला म्हणाले. या उदात्त औदार्याने मी तर पूर्ण विरघळून गेलो होतो. अशा प्रकारचे औदार्य माणूस म्हणून जन्मजात असल्याशिवाय शक्य वाटत नाही. यशवंतराव भांगरे हे जात, धर्म, पंथ, पक्ष या सर्व मानवनिर्मित अडथळ्यांच्या भिंती पाडून सर्वोच्च पातळीवरील निखळ ‘माणूस’ म्हणून मोठे होते. म्हणूनच त्यांचा जन्म आदिवासी कुटुंबातील असला तरी ते केवळ आदिवासी समाजाचे नेते नव्हते, तसेच ते राजकारणात काँग्रेस पक्षाचे नेते असले तरी काँग्रेस व्यतिरिक्तच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांवर व जनतेवरही तेवढेच प्रेम करीत होते. याचा स्वानुभव मी वर सांगितलाच आहे. सर्वांप्रती सारखाच भाव ठेवणारे, खरेखुरे मानवतावादी होते. म्हणूनच ते केवळ विधानसभेतील तालुक्याच्या मतदार संघातील जनतेचे औपचारिक नेतृत्व करीत असले तरी तेवढ्या मर्यादेत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मोजमाप करता येणार नाही. शत्रूलाही मित्र मानण्याचे जन्मजात औदार्य असलेला हा मानवतावादी, राजकारण, समाजकारण, धर्मकारण, आमदार, मंत्री या सर्व बिरुदावलीच्या पलिकडे जावून, संपूर्ण समाजाला प्रेमाने जिंकून राजकारणाच्या साधनातून लोककारण करणारा नेता होता. आपल्या पक्षीय मर्यादा ओलांडून सर्वांना जिंकणारा नेता म्हणूनच जनतेच्या सिंहासनावर आरूढ होऊन आपले भूतलावरील अस्तित्व असेपर्यंत अधिराज्य गाजविणारा खराखुरा रयतेचा राजा होता. त्याचे कुटुंब म्हणजे एक गोकूळच होते. तो एक मोठा परिवारच होता. त्यांच्या कुटुंबात प्रवेश करणाऱ्या कुणाही पाहुण्याला, कार्यकर्त्याला अगर सामान्य गरीब माणसाला जेवण करू दिल्याशिवाय जाऊ द्यावयाचे नाही, ही त्या परिवाराची खासीयत होती व आजपर्यंत त्यांच्या वारसांनीही ती जपली आहे.
चिरंजीव अशोकराव भांगरे यांनीही ती अखंडपणे चालू ठेवली आहे. आपल्या लौकिक अस्तित्वानंतरही जनतेला प्रेरणा देणाऱ्या या रयतेच्या राजाचे चिरंतन स्मारक म्हणून त्यांच्या जयंती कार्यक्रमाचे औचित्य साधून चि. अशोक भांगरे व त्यांच्या परिवाराने त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून स्मारक करण्याचे ठरविले. ही केवळ त्यांच्या कुटुंब व परिवारालाच नव्हे तर संपूर्ण तालुक्यालाच आनंद देणारी घटना आहे. या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. हे स्मारक तालुक्यातील सर्व जनतेला व पुढील पिढ्यांमधील तरुणाईला मानवतावादाची प्रेरणा देणारे ठरेल.
-दशरथ सावंत
(शेतकरी नेते)
लेखक- राज्यातील शेतकरी नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत.