पतंग उडवण्यातही आले आता ‘राजकारण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 01:09 PM2020-01-12T13:09:23+5:302020-01-12T13:10:27+5:30

विधानसभा निवडणुकीत राजकारण ढवळून निघाले. यात अनेकांचे उडणारे पतंग कापण्यात आले. अगदी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ स्थापन होईपर्यंत ही काटाकाटी दिसून आली. पतंगाच्या रूपाने राजकीय मैदानात दिसणारी ही काटाकाटी आता थेट आसमंतात चालणार आहे.

Kite flown now 'politics' | पतंग उडवण्यातही आले आता ‘राजकारण’

पतंग उडवण्यातही आले आता ‘राजकारण’

योगेश गुंड । 
केडगाव : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजकारण ढवळून निघाले. यात अनेकांचे उडणारे पतंग कापण्यात आले. अगदी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ स्थापन होईपर्यंत ही काटाकाटी दिसून आली. पतंगाच्या रूपाने राजकीय मैदानात दिसणारी ही काटाकाटी आता थेट आसमंतात चालणार आहे. पतंगाचा नवा नगरी राजकीय ट्रेंड सध्या भलताच फेमस होत आहे.
संक्रांत जवळ आली की सारे आकाश रंगीबेरंगी पतंगांनी गजबजून जाते. नगरमध्ये पतंग उडवण्याची जुनी परंपरा आहे. खास शौकीन पतंग उत्सव साजरा करतात. सध्या बागडपट्टी, दिल्लीगेट भागात विविध प्रकारच्या पतंगांचे स्टॉल सजले आहेत. येथे दरवर्षी पतंग व्यवसायातून लाखो रूपयांची उलाढाल होत असते. पतंगाचा मौसम आला की नगरमध्ये नवनवीन ट्रेंड पतंगातून बाजारात येतात. तोच ट्रेंड नंतर राज्यभर फेमस होतो, असे येथील पतंग व्यावसायिक सांगतात. राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या . यात पतंगाप्रमाणेच अनेक राजकीय नेत्यांची व पक्षांची सत्तेपासून काटाकाटी करण्यात आली. यामुळेच अनेकांचा पत्ता या निवडणुकीत कट झाला. त्याची राजकीय धगधग कायम आहे. मंत्रिमंडळ विस्तारातही ही राजकीय काटाकाटी दिसून आली. राजकीय मैदानात खेळली जाणारी ही काटाकाटी आता पतंगाच्या रूपाने मोकळ्या आकाशात खेळली जाणार आहे. कारण यंदा राजकीय पक्षांचे चिन्ह असणारे पतंगच बाजारात विक्रीला आले आहेत. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व समर्थक आपल्या पक्षांचे पतंग खरेदी करून दुसºया पक्षाचा पतंग काटण्यासाठी जणू सज्ज झाले आहेत. यात भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांचे चिन्ह पतंगात समाविष्ट करण्यात आले आहे. पतंगांसाठी विशिष्ट प्रकारच्या काड्या वापरण्यात येतात. त्या आसाममधील बांबूपासून तयार केल्या जातात. तेथील पुरामुळे कच्च्या मालाची वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी पतंगाचे उत्पादनही घटले असले तरी किमतीत फार काही वाढ झाली नाही, असे पतंग व्यावसायिक प्रशांत धोत्रे यांनी सांगितले.

Web Title: Kite flown now 'politics'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.