संगमनेरात युवकावर चाकू हल्ला; चौघांवर गुन्हा, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 06:10 PM2017-11-10T18:10:46+5:302017-11-10T18:13:12+5:30
मित्रासोबत हातगाडीवरील दूध पिण्यासाठी गेलेल्या युवकावर किरकोळ वादातून चाकू हल्ला करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी शुक्रवारी पहाटे तिघांना अटक केली. एक जण फरार आहे.
संगमनेर : मित्रासोबत हातगाडीवरील दूध पिण्यासाठी गेलेल्या युवकावर किरकोळ वादातून चाकू हल्ला करण्यात आला. गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास झालेल्या या घटनेत हा युवक गंभीर जखमी झाला. हॉटेल जोशी पॅलेस जवळच्या शिवाजी दूध सेंटरच्या हातगाडीसमोर ही घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी शुक्रवारी पहाटे तिघांना अटक केली. एक जण फरार आहे.
अनंत शिरीषकुमार परदेशी असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्या फिर्यादीवरून जय सोनार, बंटी पंचारिया, शिवाजी दुधवाल्याची दोन मुले (नावे माहीत नाही) अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परदेशी हा मित्रांसोबत गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शिवाजी दूधवाल्याच्या हातगाडीवर दूध पिण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथे सोनार व परदेशी यांच्यात काही कारणावरून किरकोळ वाद झाले. यातून सोनार याने परदेशीच्या पोटावर, हातावर व मानेवर चाकूने वार केले. यात परदेशी हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर तेथे असणाºया शिवाजी दूधवाल्याच्या दोन मुलांनीही परदेशी याला शिवीगाळ व मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. परदेशी याला घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले. पंचारिया व शिवाजी दुधवाल्याच्या दोन मुलांना शहर पोलिसांनी अटक केली. सोनार हा फरार आहे.
...................................................
पोलिसांच्या आशीर्वादाने हॉटेल सुरू
संगमनेरातील काही ठराविक हॉटेल पोलिसांच्या आशीर्वादाने २४ तास सुरू असतात. अशा हॉटेलांमध्ये किरकोळ कारणांवरून अनेकदा हाणामारीचे प्रकार घडले आहेत. गुन्हेगारांचे अड्डे बनलेल्या अशा हॉटेलांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.