कोल्हे विधानसभा निवडणूक लढविणार नाही; भाजपकडून राज्यसभेचा शब्द
By सचिन धर्मापुरीकर | Published: October 23, 2024 12:51 PM2024-10-23T12:51:53+5:302024-10-23T12:52:28+5:30
कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे अजित पवारांसोबत महायुतीत सहभागी झाल्याने त्यांची उमेदवारी निश्चित होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या स्नेहलता कोल्हे यांच्यासमोर राजकीय पेच निर्माण झाला होता...
कोपरगाव (अहिल्यानगर) : कोपरगाव : माजी आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवत निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन बैठका मंगळवारी मुंबईत पार पडल्या. यावेळी स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांना राज्यसभा अथवा विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द देण्यात आला असल्याचे कळते.
कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे अजित पवारांसोबत महायुतीत सहभागी झाल्याने त्यांची उमेदवारी निश्चित होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या स्नेहलता कोल्हे यांच्यासमोर राजकीय पेच निर्माण झाला होता. हा पेच सोडविण्यासाठी प्रदेश व केंद्रस्तरावरून हालचाली सुरू होत्या.
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माजी आ. स्नेहलता कोल्हे यांची चर्चा झाली. फडणवीस यांनी कोल्हे यांच्या पक्षकार्याबाबतचा सकारात्मक अहवाल महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांना पाठविला. त्यानंतर भूपेंद्र यादव व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेची दुसरी फेरी झाली. पक्ष कोल्हे कुटुंबीयांचा योग्य तो सन्मान राखेल, असे नेतृत्वाने सांगितले. विवेक कोल्हे यांना राज्यसभेवर आठवा विधान परिषदेवर लवकरच संधी देण्यात येईल असे आश्वासन कोल्हे यांना देण्यात आले.
भारतीय जनता पक्षाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर कोल्हे कुटुंबीयांनी विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.