कोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 01:48 PM2018-09-24T13:48:13+5:302018-09-24T13:50:03+5:30
गत महिन्यात कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे दरोडा टाकून सुमारे ३५ लाखांचा ऐवज लंपास करणारा तसेच गोळीबार करुन एका सराफाला ठार तर दुसऱ्या सराफाला गंभीर जखमी करणारा पपड्या काळे याला अखेर अहमदनगर पोलिसांनी बेड्या ठोकण्यात यश मिळविले आहे.
अहमदनगर : गत महिन्यात कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे दरोडा टाकून सुमारे ३५ लाखांचा ऐवज लंपास करणारा तसेच गोळीबार करुन एका सराफाला ठार तर दुसऱ्या सराफाला गंभीर जखमी करणारा पपड्या काळे याला अखेर अहमदनगर पोलिसांनी बेड्या ठोकण्यात यश मिळविले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सेंदला (ता. मेहेकर) येथून सोमवारी पहाटे तीन वाजता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पपड्या काळेच्या टोळीने यापूर्वी आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी धाडसी दरोडे टाकले आहेत. पपड्या काळे याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये २० गुन्हे दाखल असून, तीन गुन्ह्यांमध्ये त्याल जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मिना, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, मेहेकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, सहाय्यक निरीक्षक रोहन खंडागळे, कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, योगेश गोसावी, दिगंबर कारखिले, अण्णा पवार, रवींद्र कर्डिले, रवी सोनटक्के, मनोज गोसावी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
१९ आॅगस्ट रोजी कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्सववर पपड्या काळेच्या गँगने दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला होता. तसेच दुकानाचे मालक गणेश धाडगे व शाम धाडगे यांच्यावर बोळीबार करुन शाम धाडगे यांची हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत पपड्या गँगमधील १३ आरोपी व सोने, चांदी विकत घेणारे तीन सराफ अशा एकूण १६ जणांना अटक केली आहे.
साधूच्या वेषात आला बायकोला भेटायला
पपड्या काळे साधूचा वेष धारण करुन सेंदला (ता. मेहेकर) येथील एका पारधी वस्तीवर राहणा-या त्याच्या पत्नीला भेटायला येणार असल्याची माहिती पोलिसांना खब-यामार्फत मिळाली. पोलिसांनी पाळत ठेवून सोमवारी पहाटे तीन वाजता छापा टाकून पपड्या काळे याला बेड्या ठोकल्या.