‘त्या’ रॉकेलचे गौडबंगाल कायम
By Admin | Published: May 5, 2017 01:35 PM2017-05-05T13:35:00+5:302017-05-05T13:35:00+5:30
बेकायदेशीर विक्रीसाठी जाणारे रॉकेल वाहनासह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही़
आॅनलाइन लोकमत
भेंडा (अहमदनगर), दि़ ५ - खुल्या बाजारात बेकायदेशीर विक्रीसाठी जाणारे रॉकेल वाहनासह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही़ त्यामुळे हे रॉकेल नेमके कोणाचे, याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत असून, प्रशासन मात्र एकमेकांकडे बोट दाखविण्यात मश्गूल आहे़
तरवडी (ता. नेवासा) येथील एका व्यक्तीस विना क्रमांकाच्या वाहनातून कुकाण्याकडे रॉकेलचा बॅरल घेऊन जाताना रंगेहात पकडण्यात आले होते़ विशेष म्हणजे रेशनकार्डवर विकण्यासाठी आलेले हे रॉकेल वाहनातील कांद्याच्या गोण्याआड लपवून नेण्यात येत होते़ पोलीस पाटील विकास भागवत यांना ही माहिती मिळताच त्यांनी ते रॉकेल पकडून वाहनासह नेवासा पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना २५ एप्रिल रोजी रात्री घडली. २६ एप्रिल रोजी पोलीस पाटील भागवत यांनी नेवासा तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना कळविले़ मात्र, अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही़ या प्रकरणी नेवासा पोलीस अशा प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचे सांगतात. तर पुरवठा निरीक्षकांन विचारले असता पोलिसांना गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे खुल्या बाजारात विक्रीसाठी जाणारे रॉकेल नेमके कोणाचे, पोलिसांनी गुन्हा दाखल का केला नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत़