कोपर्डी खटला : आरोपीचे वकील वाहतूक कोंडीत अडकल्याने सुनावणी लांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 06:05 PM2017-10-11T18:05:04+5:302017-10-11T18:14:24+5:30
अहमदनगर : कोपर्डी खटल्यातील आरोपी संतोष भवाळचे वकील अॅड. बाळासाहेब खोपडे बुधवारी पुणे येथून नगरला येताना वाघोली येथे वाहतूक कोंडीत ...
अहमदनगर : कोपर्डी खटल्यातील आरोपी संतोष भवाळचे वकील अॅड. बाळासाहेब खोपडे बुधवारी पुणे येथून नगरला येताना वाघोली येथे वाहतूक कोंडीत अडकल्याने त्यांना न्यायालयात हजर राहता आले नाही. त्यामुळे खटल्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली.
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे़ या खटल्यात सरकारी व बचाव पक्षाच्यावतीने सर्व साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाली आहे. आता फक्त अंतिम युक्तिवाद बाकी आहे़ बुधवारी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम हे सरकारी पक्षाच्यावतीने अंतिम युक्तिवाद करणार होते. मात्र आरोपी संतोष भवाळ याचे वकील खोपडे न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे पुढील सुनावणी २६,२७,२८ आॅक्टोबर रोजी होणार आहे.
दरम्यान अॅड. निकम यांनी सांगितले की, खटल्याचे कामकाज लवकर पूर्ण व्हावे यासाठी मी कोल्हापूर येथील कामकाज आटोपून रात्री प्रवास करून नगरला पहाटे पोहोचलो. आरोपीचे वकील मात्र पुणे येथून नगरला पोहोचू शकले नाहीत ही खेदाची बाब आहे. येण्यास अडचण होती तर त्यांनी फोन करून कळविणे गरजेचे होते़ आमचा वेळ वाचला असता. पुणे येथून नगरला येण्यासाठी वाघोली हा एकमेव मार्ग नाही ते दुस-या मार्गानेही येऊ शकत होते़ अॅड. खोपडे पुढील सुनावणीला हजर राहतील अशी अपेक्षा आहे असे निकम म्हणाले़ कोपर्डी खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने ३१ तर आरोपी पक्षाच्यावतीने १ अशा ३२ साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाली आहे. आता सरकारी पक्ष व बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद बाकी असल्याने हा खटला अंतिम टप्प्यात आहे.