Live : कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण, 29 नोव्हेंबरला होणार दोषींच्या शिक्षेचा फैसला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 09:11 AM2017-11-22T09:11:21+5:302017-11-22T13:09:05+5:30
कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींच्या शिक्षेचा फैसला 29 नोव्हेंबरला होणार आहे.
अहमदनगर : कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची आज सुनावली जाणार आहे. शिक्षेच्या सुनावणीनिमित्त अहमदनगर कोर्टाबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या खटल्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. त्यामुळे दोषींना जन्मठेप की फाशी हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सुनावणीवेळी कोर्ट परिसरात मोठी गर्दी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना फाशी नको, जन्मठेप द्या, दोषींच्या वकिलांची विनंती
कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या खटल्यात मंगळवारी दोन दोषींच्या वकिलांनी शिक्षेवर युक्तिवाद केला. जितेंद्र शिंदेच्या वकिलाने फाशीऐवजी जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी केली. तर नितीन भैलुमे याच्या वकिलाने कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केली. बुधवारी संतोष भवाळचे वकील व सरकारी पक्षाकडून अॅड. उज्ज्वल निकम शिक्षेबाबत युक्तिवाद करतील.
शिंदे याच्या वतीने योहान मकासरे, तर भैलुमे याच्या वतीने प्रकाश आहेर यांनी युक्तिवाद केला़ मकासरे म्हणाले, शिंदे याला पत्नी व आई-वडील आहेत.त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे़ ही बाब विचारात घेऊन त्याला जन्मठेपेची शिक्षा द्यावी.
न्यायालयाने जितेंद्र शिंदे यास शिक्षेबाबत काही बोलायचे आहे का, अशी विचारणा केली. त्यावर, आपण त्या मुलीला मारलेच नाही, दुसरेच कुणीतरी मारले आहे. शिक्षा एक दिवस काय आणि हजार दिवसांची काय, असे उत्तर त्याने दिले.
मी निर्दोष आहे - भैलुमे
नितीन भैलुमे याला समोर बोलावून शिक्षेबाबत न्यायालयाने विचारले, तेव्हा त्याने ‘मी निर्दोष आहे’ एवढेच सांगितले. त्याच्या डोळ्यात पाणी आले होते.
काय आहे नेमकं प्रकरण?
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्य ढवळून निघालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती. जलदगती न्यायालयात सुनावणी करुन आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली.
Live Updates
कोपर्डी बलात्कार-हत्या खटला, दोषींच्या शिक्षेवरील युक्तिवाद सुरू.
कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद सुरू.
आरोपींना दोषी ठरवणारी 13 विशेष कारणे उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाला सांगितले.
कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण. तिन्ही दोषींना फाशीच योग्य, असा उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद.
इंदिरा गांधी खटल्यातील कट रचणा-या केहर सिंगचा निकम यांनी दिला दाखला - उज्ज्वल निकम
संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरू प्राध्यापक होता, तो कटात सहभागी होता, म्हणूनच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली - उज्ज्वल निकम
दोषींच्या शिक्षेचा फैसला 29 नोव्हेंबर होणार