कोपरगावात भाजपाने पत्रक वाटून विरोधकांचा केला भांडाभोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:18 AM2021-01-21T04:18:52+5:302021-01-21T04:18:52+5:30
कोपरगाव : कोपरगाव शहरात नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपा, शिवसेना, आरपीआय व मित्र पक्षाच्या नगसेवकांनी १२ कामांपैकी एकाही ...
कोपरगाव : कोपरगाव शहरात नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपा, शिवसेना, आरपीआय व मित्र पक्षाच्या नगसेवकांनी १२ कामांपैकी एकाही कामाला मंजुरी दिली नाही. त्यामुळे नगराध्यक्ष विजय वहाडणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यांनी नामंजूर केलेल्या कामाचे पत्रक वाटून, लाक्षणिक उपोषण करून चांगलेच भांडवल केले होते. त्यातून सत्ताधारी भाजप, शिवसेना नगरसेवक शहर विकासाला खोडा घालीत असल्याचे आरोप केले होते. त्याचा समाचार घेत, भाजपा, शिवसेना, आरपीआय व मित्र पक्षाच्या नगसेवक, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मंगळवारी (दि.१९) शहरात फेरी काढून ‘सहमती एक्स्प्रेस मालामाल... नगरपालिका कंगाल’ असे परिपत्रक वाटून विरोधकांचा भांडाफोड केला आहे.
या परिपत्रकात म्हटले, शहरातील सर्व विकास कामांना गेल्या ४ वर्षांपासून झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप, शिवसेनेच्या नगरसेवकांनी बहुमतांनी मंजुरी दिलेली आहे. शहराच्या विकासासाठी आम्ही कायमच सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे. नगराध्यक्षांनी व मुख्यधिकाऱ्यांनी सांगितलेला प्रत्येक विषय त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून बहुमताने मंजूर करून दिले आहे. मागील चार वर्षांत कोपरगावनगर पालिकेच्या नियमानुसार ३६ सर्वसाधारण सभा होणे आवश्यक होते, परंतु नगराध्यक्षांच्या मनमानी व हेकेखोर स्वभावामुळे फक्त १३ सर्वसाधारण सभा झाल्या. नगरपरिषदेने १० नोव्हेंबर रोजी एकूण २८ कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. नगराध्यक्षांनी व नगरपरिषदेला सोयीची असणारी फक्त १२ कामे मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. उर्वरित १६ कामे बैठकीत का आली नाही? ही कामे ज्या प्रभागातील आहे, तेथील जनतेशी दुजाभाव कशासाठी, असे विचारले असता. नगरध्यक्षांनी व प्रशासनांनी कोणतेही उत्तर दिले नाही.
...
जनहिताच्या दृष्टिकोनातून विरोध
विशेष म्हणजे, ही सर्व कामे नगरपरिषद फंड, १४व्या वित्त आयोग आणि रस्ता अनुदान या फंडातून होणार आहे. या कामांसाठी विद्यमान आमदारांनी निधी आणला, अशा खोट्या बातम्या काळे गटाचे नगरसेवक देत आहे. आमदारांचा या निधीशी कवडीचा ही संबंध नाही. आम्ही जनहिताच्या दृष्टिकोनातून विरोध केला. हे सर्व माहीत असूनही जनतेची दिशाभूल करण्यासाठी नगराध्यक्षांनी व विरोधकांनी आमच्यावर खोटे आरोप केले. आम्ही कोणतेही कारण न देता, विषय नामंजूर केले, हे दुर्दैवी आहे. या कारभारामध्ये नगराध्यक्ष व सहमती एक्स्प्रेस यांचे संगनमत स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे खरी वस्तुस्थिती काय आहे, हे जनतेपुढे आणण्यासाठी या पत्रकांचे शहरात वाटप करण्यात आले.
...............
फोटो२०- भाजप पत्रक वाटप, कोपरगाव
200121\img-20210119-wa0085.jpg
कोपरगाव शहरात भाजपा, शिवसेना, आरपीआय व मित्र पक्षाच्या नगसेवकांनी मंगळवारी (दि.१९) पत्रक वाटप केले.