कोपरगावात एकाच दिवसात चार सापांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:25 AM2021-07-07T04:25:52+5:302021-07-07T04:25:52+5:30
कोपरगाव : एका तरुणाने एकाच दिवसात तीन अतिविषारी कोब्रासह एक धामण सापास शिताफीने पकडत निसर्गात सोडून देण्याचे नैसर्गिक कार्य ...
कोपरगाव : एका तरुणाने एकाच दिवसात तीन अतिविषारी कोब्रासह एक धामण सापास शिताफीने पकडत निसर्गात सोडून देण्याचे नैसर्गिक कार्य केले आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सर्पमित्र शिवा भोंगळ असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या धाडसाचे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत आहे.
सर्पमित्र भोंगळ यांनी शनिवारी (दि. ३) माहेगाव येथील बाळासाहेब भगुरे यांच्या द्राक्षबागेत जमिनीखाली बिळात लपून बसलेल्या पाच फूट लांबीच्या कोब्रा सापाला तीन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर बरणीत बंदिस्त केले. त्याच दिवशी सायंकाळी कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना आसवानी विभागात विषारी चार फूट नागास पकडले, कार्यकारी संचालक यांच्या निवासस्थानात एक विषारी नाग आढळून आला, तर बंगल्या पाठीमागे बिनविषारी धामण पकडण्यात आली. एकाच दिवशी चार सापास सर्पमित्र भोंगळ यांनी जीवदान दिले. सद्या पावसाळा सुरू होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटूनदेखील अपेक्षित पाऊस न झाल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा निर्माण झाला असल्याने बिळात लपून बसलेले साप बाहेर निघत असल्याचे चित्र सर्वत्र आढळून येत आहे.
..............
शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळेस बाहेर पडताना हातात बॅटरी काठी व पायात गम बूट घालूनच शेतात जावे. सर्प दंश झाल्यास घाबरून न जाता रुग्णास तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यास जीव जाण्याचा धोका कमी संभावेल. कायद्याने साप मारणे दखल पात्र गुन्हा आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत झाल्यास मिळणारी भरपाई व उपचाराची शासनाने साप चावलेल्या व्यक्तीसही मोफत सर्व हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध करावी. यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. कारण पावसाळ्यात महाराष्ट्र राज्यात साप चावून मरणाऱ्यांची संख्या मोठी असते.
- सर्पमित्र शिवा भोंगळ, कोळपेवाडी
...............
फोटो०६ - साप, कोपरगाव