कोपरगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा : आमदार स्नेहलता कोल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 03:34 PM2018-11-03T15:34:22+5:302018-11-03T15:35:45+5:30
चालू पावसाळी हंगामात कोपरगाव तालुक्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरीप पिकांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.
कोपरगाव : चालू पावसाळी हंगामात कोपरगाव तालुक्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरीप पिकांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी ट्रीगर वन लागू करावा. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. शासनांने पहिल्या टप्प्यात सर्कलनिहाय राज्यातील दुष्काळी जिल्हे जाहीर केले. तेव्हा त्याच्या दुस-या सर्व्हेक्षणात कोपरगाव तालुक्याचा दुष्काळात समावेश करून त्याबाबत शेतकरी व नागरिकांना असणां-या सोयी सुविधा द्याव्यात, अशी मागणी महसूलमंत्री तथा कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.
गोदावरी कालव्यांना पिण्यांच्या पाण्यांबरोबरच शेती सिंचनाचे आर्वतन सोडावे व नमुना नंबर सातचे प्रकटीकरण पाटबंधारे खात्यास काढण्यास सांगावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी शिर्डी दौ-यावर आले असता त्यांच्याशी साई विश्रामगृहात भेट घेवुन शेतक-यांसह हे निवेदन दिले. सध्या विरोधक दुष्काळाचे राजकारण करून युती शासनाला बदनाम करू पहात आहे. शासनाने सर्कलनिहाय राज्यातील दुष्काळी तालुके जाहिर केले आहे, मात्र त्यात कोपरगावचा समावेश नाही. पोहेगाव व दहेगाव बोलका सर्कलमध्ये गंभीर परिस्थिती असत्यांने तेथील शेतक-यांना दुष्काळाच्या योजनांचा लाभ होईल, असे प्राथमिक स्तरावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. तेव्हा संपुर्ण तालुकाच दुष्काळात होरपळत आहे. ऐन दिवाळीतच येथे नागरिकांना व जनावरांना पिण्यांच्या पाण्यांची टंचाई निर्माण झाली आहे. तेव्हा येथील शेतक-यांसह अन्य घटकांना याचा लाभ मिळालाच पाहिजे. त्यासाठी कोपरगाव तालुका दुष्काळी जाहिर करावा. त्याबाबत संबंधीत अधिका-यांना सूचना व्हाव्यात असे आमदार कोल्हे म्हणाल्या. रांजणगाव देशमुख प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा धोंडेवाडी पाझर तलाव चालु आर्वतनांत दुष्काळी स्थितीत भरून मिळावा अशी मागणीही आमदार कोल्हे यांनी केली.