कोपरगावात भाजीपाला विक्रेत्यांचा नगराध्यक्षांच्या घरासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 12:18 PM2020-05-24T12:18:12+5:302020-05-24T12:18:49+5:30
प्रशासनाने ठरवून दिलेले नियम व अटी या मान्य नसल्याने कोपरगाव शहरातील भाजीपाल्याचा आठवडेबाजार करणारे शेकडो शेतकरी व व्यापा-यांनी रविवारी सकाळी ९ वाजता नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले.
कोपरगाव : प्रशासनाने ठरवून दिलेले नियम व अटी या मान्य नसल्याने कोपरगाव शहरातील भाजीपाल्याचा आठवडेबाजार करणारे शेकडो शेतकरी व व्यापा-यांनी रविवारी सकाळी ९ वाजता नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले.
जमाव बंदीचे आदेश असताना या ठिकाणी शेकडोच्या संखेत मोठा जमाव झाला होता. याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी यात हस्तक्षेप करून त्यांची समजूत काढून त्यांना वहाडणे यांच्या घरासमोरून काढून दिले. कोपरगावात प्रशासनाने शहरातील फक्त आठवडेबाजार करणाºया शेतकरी व विक्रेत्यांना मंगळवार व शुक्रवार या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत बाजारतळ येथील आठवडे बाजारातील ओट्यांवर बसण्याचे आदेश नागरपरिषद व प्रशासनाने दिला आहे. हा आदेश भाजीविक्रेते, व्यापा-यांना मान्य नसल्याने त्यांनी रविवारी सकाळी शहरातील धारणगाव रस्त्याच्याकडेला बाजार भरविण्यास सुरुवात केली. मात्र नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाने त्यांना रस्त्याच्याकडेला बसण्यास तुम्हाला परवानगी नाही. रस्त्यावर गर्दी होऊन फिजिकल डिस्टसिंग पाळले जाणार नाही. असे सांगत त्या ठिकाणाहून दुकाने काढण्यास सांगितले. मात्र आठवडे बाजार करणारे भाजीपाला विक्रेत्यांनी त्यास हरकत घेऊन आम्हाला ज्या दिवशी भाजीपाल्याचा लिलाव होतो. त्यादिवशी विक्री करण्याची परवानगी द्यावी. नेहरू भाजी मार्केटमध्ये जर तुम्ही काही भाजीपाला विक्रेत्यांना रोज बसण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शहराच्या एका बाजूला असलेल्या बाजार ओट्याकडे नागरिक भाजीपाला खरेदीसाठी येणार नाही. तुम्ही एक तर सर्वांना तिकडे बसवा किंवा आम्हाला तहसील मैदान येथे बसण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
बाजार ओट्यावरच विक्री करा
मात्र प्रशासनाने आपल्या भूमिकेवर ठाम राहत त्यांचा भाजीपाला माल जप्त करण्यास सुरुवात केली. त्यानंतर बाजार करणारे भाजीपाला विक्रेते यांनी नगराध्यक्ष यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. मात्र नगराध्यक्ष बाहेरगावी गेले असल्याने त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने येऊन भाजीपाला विक्रेते, व्यापारी यांची समजूत काढत बाजारतळ येथील बाजार ओट्यावरच तुम्हाला बसावे लागेल. भाजीपाल्याचा ज्या दिवशी लिलाव होईल ते दोन दिवस तुम्हाला ठरवून देण्यात येतील. असे सांगत जप्त केलेला भाजीपाल्याचा माल पोलीस निरीक्षक माणगावकर यांनी परत देण्याच्या सूचना केल्या. बाजारतळ येथील बाजार ओट्यांवर त्यांना भाजीपाला विक्री करण्यास सांगितले.