कोपरगाव आठवडे बाजाराचे ओटे आठ महिन्यापासून धूळखात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 04:05 PM2020-02-16T16:05:27+5:302020-02-16T16:07:04+5:30
कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बाजारतळ परिसरात ३२ गुंठे जागेत सुमारे १ कोटी ८९ लाख रुपये खर्चून आठ महिन्यापूर्वी बाजारओटे बांधले. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव देऊन बांधण्यात आलेले आठवडे बाजार ओटे धूळखात पडून आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
रोहित टेके ।
कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेने सोमवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी बसण्याकरिता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी बाजारतळ परिसरात ३२ गुंठे जागेत सुमारे १ कोटी ८९ लाख रुपये खर्चून आठ महिन्यापूर्वी बाजारओटे बांधले. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव देऊन बांधण्यात आलेले आठवडे बाजार ओटे धूळखात पडून आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
कोपरगाव नगरपरिषदेने भाजीपाला विक्री करणा-या शेतकरी, व्यापारी यांच्या दृष्टीने डिसेंबर २०१७ मध्ये काम सुरु करून जून २०१९ मध्ये २२०० चौरस फुटाचे काम पूर्ण केले. त्यात १५ आठवडे बाजार ओट्यांच्या शेडची निर्मिती केली. या ओट्यांची अंदाजे ३३४ इतकी संख्या आहे. उर्वरित मोकळ्या जागेतही १५० असे एकूण ५०० च्या वर विक्रेते या ठिकाणी बसू शकतात.
कोपरगाव शहरातील आठवडे बाजारात १२०० च्या आसपास शेतकरी तसेच इतर व्यापारी आपला माल विक्रीसाठी घेऊन येत असतात. त्यापैकी आर्धी संख्या ही शेतमाल विक्री करणा-यांची आहे. परंतु शेतमाल विक्री करणा-यांना जुन्या जागेवर बाजार भरला जातो तेथे जागा मिळत नाही. पर्यायाने हे सर्व विक्रेते शहरातील मुख्यरस्ता तसेच उपरस्त्यावर आपला शेतमाल घेऊन बसतात. त्यामुळे दर सोमवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मात्र याकडे नगरपरिषद प्रशासन गंभीरतेणे बघत नसल्याने याचा हकनाक त्रास शहरात येणा-या प्रवाशांना सहन करावा लागतो.
नागरिकांचा त्रास कमी होणार का ?
शासनाकडून कोट्यवधींचा निधी मिळवून आठवडे बाजारात भाजीपाला विक्री करणा-यासाठी बांधलेली आठवडे बाजार ओटे गेल्या आठ महिन्यापासून धूळखात पडून आहे. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रासही सहन करावा लागत आहे. मात्र ही कोंडी कमी करण्यासाठी पालिकाप्रशासन काय भूमिका घेते याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.
भाजीपाला विक्रेत्यांना लवकरच नवीन बांधण्यात आलेल्या जागेत स्थलांतरित करण्यात येईल. त्यातून वाहतूक कोंडीचे देखील प्रमाण कमी होईल, असे कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सांगितले.