बेलापुरात कोरी पाटी व सुशिक्षित उमेदवारांची चलती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:19 AM2021-01-21T04:19:36+5:302021-01-21T04:19:36+5:30
श्रीरामपूर : तालुक्यातील सर्वांत मोठ्या बेलापूर ग्रामपंचायतीत यावेळी सत्तांतराबरोबरच काही धक्कादायक निकाल नोंदविले गेले. त्याचबरोबर काही नवीन राजकीय चेहऱ्यांचा ...
श्रीरामपूर : तालुक्यातील सर्वांत मोठ्या बेलापूर ग्रामपंचायतीत यावेळी सत्तांतराबरोबरच काही धक्कादायक निकाल नोंदविले गेले. त्याचबरोबर काही नवीन राजकीय चेहऱ्यांचा उदय झाला. आता सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, जनता आघाडीचे रवींद्र खटोड यांच्या जनता विकास आघाडीला १० वर्षांनंतर सत्तेतून पायउतार व्हावे लागले. विरोधी गावकरी मंडळाने ११ विरुद्ध ६ अशा मतांच्या फरकाने हा विजय मिळविला. गावकरी मंडळाला भारतीय जनता पक्ष तसेच जिल्हा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मुथ्था यांची मोठी साथ मिळाली. जि.प. सदस्य शरद नवले तसेच अशोक साखर कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांनी गावकरी मंडळाची धुरा वाहिली.
यंदाच्या निवडणुकीत भ्रष्टाचार आणि ठेकेदारी हाच कळीचा मुद्दा राहिला. विरोधकांनी त्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. गावातील शुद्ध पाणीपुरवठा, रखडलेली अंतर्गत रस्त्यांची कामे, सार्वजनिक स्वच्छता हे प्रश्न प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिले. मात्र सत्ताधाऱ्यांनी त्याविरोधात तितकाच जोरदार प्रचार केला. गावामध्ये केलेली विकासकामे, घरकुल योजनांवर त्यांनी भर दिला. शेवटच्या टप्प्यात हा प्रचार व्यक्तिकेंद्री बनला.
गावकरी मंडळाने दिलेल्या तरुण व सुशिक्षित उमेदवारांचा त्यांना सकारात्मक लाभ झाला. उमेदवारांची कोरी पाटी व विकासासाठी एक संधी यासाठी त्यांनी मतांचा जोगवा मागितला. त्यात त्यांना यश आले. दुसरीकडे सत्ताधारी जनता विकास आघाडीला सत्तेविरोधी लाटेचा फटका बसला. दहा वर्षांच्या सत्तेला साचलेपणा आल्याने जनतेला बदल अभिप्रेत असल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
--------------
दिग्गजांना पराभवाची चव
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक यांचे बंधू चंद्रकांत यांचा अशोकचे संचालक व युवा नेते अभिषेक खंडागळे यांनी ४५० मतांनी पराभव केला. २० वर्षांहून अधिक काळ वाॅर्डावर पकड ठेवणारे नाईक यावेळी पराभूत झाले. बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनाही पराभवाची चव चाखावी लागली. जि.प.सदस्य शरद नवले यांचे बंधू चंद्रकांत यांनी त्यांना पराभूत केले.
-------------