कोतूळ पुलाच्या कामाला लागला लगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:26 AM2021-02-27T04:26:53+5:302021-02-27T04:26:53+5:30
कोतूळ : कोतूळ येथील मुळा नदीवरील वीस कोटी रुपयांच्या पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर होऊन एक वर्ष पूर्ण झाले. ठेकेदाराने ...
कोतूळ : कोतूळ येथील मुळा नदीवरील वीस कोटी रुपयांच्या पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर होऊन एक वर्ष पूर्ण झाले. ठेकेदाराने यंत्र व कामगारही आणले. मात्र, जलसंपदाच्या व्यवस्थापन विभागाने अर्धवट पाणी सोडून पुलाच्या कामाला लगाम लावला. हे काम कोणी व का अडविले यावर संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.
कोतूळ येथील नागरिकांनी सातत्याने चार वर्षे आंदोलने, बैठा सत्याग्रह, मंत्री अन् अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवून वीस कोटी रुपयांचा पूल पदरात पाडून घेतला. जानेवारी महिन्यात लोकमतने ‘पुलाचे घोडे अडले कुठे?’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करताच ठेकेदाराने तातडीने पोकलेन मशीन, कामगार व शेड उभ्या केल्या. फेब्रुवारी महिन्यात पहिले आवर्तन सुटल्यावर निविदेत नमूद केल्याप्रमाणे ६५३ तलांक रेषेपर्यंत काम सुरू करण्याचे जलसंपदाचे आदेश आहेत.
फेब्रुवारी महिन्यात कोतूळ येथे आमदार डाॅ. किरण लहामटे यांच्या उपस्थितीत पिंपळगाव खांड धरण कालवा सल्लागार समितीची आवर्तन बैठक पार पडली. त्यात मागणीनुसार पाणी सोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पाणीही सोडले. मात्र, कोतूळ पुलाचे काम करण्यासाठी शासनाने निविदेत ठेकेदाराशी केलेल्या कराराइतके पाणी सोडले जाईल व काम सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र, जलसंपदा व्यवस्थापन विभागाने अपेक्षित पाणी न सोडल्याने कोतूळ पुलाचे काम थांबले आहे.
पिंपळगाव खांड धरणाच्या आतील शेतकऱ्यांना अंबित, बलठण, देवहंडी या जलाशयातून दोन आवर्तने निश्चित आहेत तर खालच्या लाभक्षेत्रात कोतूळ जुना पुल रिकामा झाल्यावरही दोन आवर्तने होतात. हे पाणी आभाळवाडीपर्यंत जून महिन्यापर्यंत पुरते.
राजकीय इच्छाशक्ती असेल तर जलसंपदा व कालवा सल्लागार समितीने योग्य नियोजन केल्यास पूलही होईल व लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही पाणी मिळेल. मात्र, सध्या पुलाचे काम सुरूच होणार नाही इतके पाणी सोडून जलसंपदाने पुलाच्या कामाला लगाम लावला आहे. हा लगाम अधिकाऱ्यांनी की राजकीय इच्छाशक्तीने लावला याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. यावर्षी काम सुरू न झाल्यास पिंपरकणे पुलासारखी कोतूळची अवस्था होईल हे निश्चित आहे
...........................
नान्नोर यांचा प्रतिसाद नाही
जलसंपदा व्यवस्थापन विभागाचे शाखा अभियंता जी. जी. नान्नोर यांच्याशी याबाबत चौकशी करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
.....................
पुलाचे काम धरणातील पाणी सील लेव्हलला गेल्यावरच सुरू करता येईल. मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात दुसरे आवर्तन केल्यास काम सुरू करता येईल. पुलाचे काम दोन वर्षात पूर्ण होईपर्यंत योग्य पाणी नियोजन व जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे.
- संदीप देशमुख, शाखा अभियंता, जलसंपदा, स्थापत्य
................
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात कोतूळ पूल रिकामा होतो. इतके पाणी आभाळवाडीपर्यंत सोडले जाते. यंदा मात्र कोतूळ पुलावर चार ते पाच फूट पाणी असतानाच पाणी बंद केले. लोकप्रतिनिधींना कुणीतरी चुकीची माहिती देत आहे. कोतूळ पुलाच्या कामाला कुणीही जाणीवपूर्वक आडकाठी करू नये.
-अरविंद देशमुख, अध्यक्ष, पूल कृती समिती.
(२६कोतूळ)