कोतवालाची मुलगी बनली डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:20 AM2021-04-22T04:20:36+5:302021-04-22T04:20:36+5:30
डॉ. तबस्सुम पठाण या पारनेर तालुक्यातील वडझीरे येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील इब्राहीम पठाण हे वडझीरे येथे कोतवाल आहेत. ...
डॉ. तबस्सुम पठाण या पारनेर तालुक्यातील वडझीरे येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील इब्राहीम पठाण हे वडझीरे येथे कोतवाल आहेत. कोतवालाच्या नोकरीतून त्यांना जेमतेम पाच ते सात हजार रुपये मानधन मिळत असे. त्या तुटपुंज्या मानधनावर त्यांची कुटुंबाची गुजराण करून दोन मुली व एका मुलाला चांगले शिक्षण देण्याची जिद्द होती. प्रसंगी पोटाची उपासमार सहन करून मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यासाठी त्यांना गृहिणी असलेली त्यांची पत्नी अमिना यांनी चांगली साथ दिली. मुलगी तमन्ना हिने एम.एस्सी.बी.एड. पूर्ण केले. मुलगा समीर सध्या एल.एल.बी. पदवीचे शिक्षण घेत आहे. डॉ. तबस्सुम हिने आईवडिलांच्या जिद्दीला सलाम करीत प्राथमिक शिक्षण घेत असतानाच डॉक्टर बनण्याची खुणगाठ मनात बांधली होती. मात्र घरची आर्थिक परिस्थिती तिला डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यायोग्य नव्हती. आठवीत माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविले. त्या शिष्यवृत्तीवर तिला बारावीपर्यंतचे शिक्षण नगर येथील रेसिडेन्सियल हायस्कूलमधून पूर्ण करता आले. दहावीत ९२ टक्के गुण मिळविण्यात ती यशस्वी झाली. अभ्यासात सातत्य ठेवून बारावी शास्त्र शाखेत ८१ टक्के गुण मिळविले. डॉक्टर बनण्याची तिची जिद्द होती.
त्यादृष्टीने तिला नगर येथील गुणे शास्त्री आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तिथेही तिला राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला. त्या शिष्यवृत्तीच्या जोरावर तिने बीएएमएस पूर्ण करून अखेर डॉक्टर बनण्याचे स्वप्न तडीस नेले.
..........
सध्या कोरोनाच्या काळातच ग्रामीण रुग्णांची सेवा करण्याची त्यांना संधी मिळाली. पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या आरोग्य अधिकारी डॉ. जयदेवी राजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली द्वितीय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या मनापासून रुग्णांची सेवा करताना पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांत त्या एकदाही वडझीरे येथे घरी सुट्टीवर गेलेल्या नाहीत. संधी मिळाली की तिचे सोने करायचे. खरे शिक्षण अडचणीत तुम्ही कसे जिद्दीने लढता यावरच अवलंबून असल्याचे डॉ. तबस्सुम यांचे म्हणणे आहे.
..............
शिक्षण पूर्ण झाले. आता आई-वडिलांना आर्थिक हातभार लावण्याची वेळ आहे. लहान भाऊ समीर याला शिक्षणात मदत करून मोठा अधिकारी बनवायचे आहे.
- डॉ. तबस्सुम पठाण