‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर जामखेडमध्ये कोवीड सेंटर; रत्नदीप फाउंडेशनचे रोहित पवारांनी केले कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 01:21 PM2020-09-26T13:21:35+5:302020-09-26T13:21:41+5:30
कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहून येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशनने ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर कोवीड सेंटर उभारून रूग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. त्यांनी १०० बेड उपलब्ध केले असून २० बेड आॅक्सीजन सुविधा देणारे आहेत. डॉ. भास्करराव मोरे यांनी मतदारसंघात कोवीड सेंटर उपलब्ध करून शासनाला सहकार्य करण्यासाठी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
जामखेड : कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहून येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशनने ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर कोवीड सेंटर उभारून रूग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. त्यांनी १०० बेड उपलब्ध केले असून २० बेड आॅक्सीजन सुविधा देणारे आहेत. डॉ. भास्करराव मोरे यांनी मतदारसंघात कोवीड सेंटर उपलब्ध करून शासनाला सहकार्य करण्यासाठी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
जामखेड-कर्जत रस्त्यावर रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर (रत्नापूर) या संस्थेच्या वतीने कोवीड-१९ सेंटर या हॉस्पिटलचे नुकतेच उद्घाटन आ.रोहित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार पवार बोलत होते. यावेळी रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे पाटील, प्रदीप दळवी, शरद ढवळे, अशोक पठाडे, ज्ञानदेव ढवळे, प्रवीण चोळके, संजय पोपळे, रोहित राळेभात, डॉ.आनंद लोंढे डॉ अजय वराट, दत्तात्रय वारे, महेश मोरे, प्रशांत कानडे, गणेश दगडे अविनाश कोळपकर , जयश्री बांगर, अनिता रोकडे, पल्लवी सगळे आदी उपस्थित होते.
खाजगी रूग्णालयाकडून होणारी लूट पाहता रत्नदीप फोंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे यांनी सुसज्ज हॉस्पिटल उपलब्ध करून कोरोना रूग्णांना माफक दरात सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यापूर्वी त्यांनी क्वारंटाइनमध्ये असलेल्या नागरिकांची सेवा मोफत करून रुग्णांच्या प्रती संवेदना व्यक्त केली आहे. यापुढील काळात त्यांनी अशीच सहकार्याची भावना ठेवावी, अशी अपेक्षा आमदार पवार यांनी व्यक्त केली.
ना नफा ना तोटा या तत्त्वावर सदर सेंटर चालू केले आहे. रूग्णांची अर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी आम्ही सेंटर स्थापन केले आहे. खासगी कोवीड रूग्णालयाने रुग्णांना फी मध्ये सवलत देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. भास्करराव मोरे पाटील यांनी केले.