वाड्यावस्त्यांवरील रुग्णांसाठी मायंबा देवस्थानचे कोविड सेंटर ठरले आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:29 AM2021-06-16T04:29:08+5:302021-06-16T04:29:08+5:30
तिसगाव : कोरोना महामारीत गर्भगिरीतील मत्सेंद्रनाथ (मायंबा) देवस्थानच्या वतीने वाड्यावस्त्यांवर सुरू केलेली तेरा कोविड सेंटर गरजू रुग्णांसाठी मोठा आधार ...
तिसगाव : कोरोना महामारीत गर्भगिरीतील मत्सेंद्रनाथ (मायंबा) देवस्थानच्या वतीने वाड्यावस्त्यांवर सुरू केलेली तेरा कोविड सेंटर गरजू रुग्णांसाठी मोठा आधार ठरली आहेत. या सेंटरमधून आतापर्यंत ९०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.
२९ एप्रिल रोजी देवस्थान आवारात पहिले कोविड सेंटर सुरू झाले. अवघ्या ३३ दिवसांतच येथून १४३ रुग्ण बरे झाले. यापैकी ६५ रुग्ण ज्येष्ठ आहेत. यात शेंडगेवाडी येथील ७८ वर्षीय तान्हाबाई कोकरे यांचाही समावेश आहे. सध्या या सेंटरमध्ये ४७ रुग्ण उपचार घेत आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत विश्वस्थ मंडळाने आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील वाड्यावस्त्यांवर तेरा कोविड सेंटर सुरू केली. या सेंटरमध्ये कोरोना चाचणीही केली जात आहे. सेंटरमधील रुग्णांना दोनदा चहा, नाष्टा, जेवण व रात्री दूध असा आहार दिला जातो. पूरक आहारामुळे रुग्णांना शारीरिक बळकटी मिळत असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. नितीन मोरे, डॉ. मिनिनाथ म्हस्के यांनी सांगितले. देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, सरपंच राजेंद्र म्हस्के व सर्व विश्वस्थ मंडळ या कोविड सेंटरसाठी परिश्रम घेत आहेत तसेच या सामाजिक कार्यालयात अनेक संस्था, दानशूर मंडळी, ग्रामस्थ, वनाधिकारी श्याम शिरसाठ, पोलीस अधिकारी सतीष शिरसाठ, तहसीलदार प्रदीप पालवे यांनीही योगदान दिले आहे.
फोटो आहे.