रेमडेसिवीर देण्याची जबाबदारी कोविड हॉस्पिटलवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:21 AM2021-04-11T04:21:05+5:302021-04-11T04:21:05+5:30
अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची फरपट अखेर शनिवारी थांबली. जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी तीन हजार रेमडेसिवीर ...
अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांची फरपट अखेर शनिवारी थांबली. जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी तीन हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध झाले. ते इंजेक्शन थेट औषधी दुकानांना देण्याऐवजी फक्त कोविड हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या औषधी दुकानांना देण्यात आले आहेत. रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आता कोविड हॉस्पिटलवरच सोपविण्यात आली आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची पायपीट थांबणार आहे.
जिल्ह्यात रोज दोन हजारांवर रुग्ण बाधित होत आहेत. बारा हजार उपचार घेत आहेत. गंभीर रुग्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर (डीसीएचसी) असलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल असतानाही रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी औषधी दुकानांचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला असून, शनिवारी सकाळीही हीच परिस्थिती होती. सायंकाळी जिल्हा रुग्णालयासाठी १६५० व डेडिकेटेड कोविड सेंटरसाठी १३३९ इंजेक्शन्स उपलब्ध झाले, अशी माहिती नोडल अधिकारी तथा सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांनी सांगितले.
--------------
‘एफडीए’ने केलेली मेडिकल दुकानांची यादी रद्द
रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील काही औषधी दुकानांची यादी प्रसिद्ध केली होती. मात्र, संबंधित दुकानांमध्ये इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचे दिसले, तसेच संबंधित औषध विक्रेत्यांचे मोबाइल क्रमांकही बंद होते. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. यामुळे अन्न व औषध प्रशासनाने जाहीर केलेली औषधी दुकानांची यादीच रद्द केली. आता रेमडेसिवीर इंजेक्शन कोविड हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या मेडिकलवरच मिळणार आहेत. कोविड हॉस्पिटलकडून मेडिकलला उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाची नावे, त्याला किती डोस लागतात याची यादी दिली जाणार आहे. त्यानुसार इंजेक्शन थेट रुग्णासाठी दिले जाणार आहे. त्यामुळे नातेवाइकांवर फरपट होणार नाही, तसेच इंजेक्शन वाटप करण्याचे अन्न व औषध प्रशासनानेच अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:कडे घेतले आहेत. त्यानुसार त्यांच्या अधिपत्याखालील ही समिती काम करणार आहे.
---------
रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा कंपन्यांकडूनच होत आहे. उत्पादन कमी झाल्याने हा तुटवडा आहे. मात्र, एक-दोन दिवसांत इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील. त्यासाठी रेमडेसिवीर रुग्णांना उपलब्धतेबाबत नवी पद्धती तयार करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू केल्याने रुग्णांना रेमडेसिवीरचा शोध घेण्याची वेळ येणार नाही.
-किशोर कदम, नोडल अधिकारी (औषधी पुरवठा),
तथा सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी
----------------
एक जोड आहे.