पिंपळगाव जोगेच्या आवर्तनानंतरच कुकडीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:21 AM2021-04-10T04:21:18+5:302021-04-10T04:21:18+5:30

श्रीगोंदा : पिंपळगाव जोगे धरणातील आवर्तन २ मेपर्यंत पूर्ण करायचे आणि त्यानंतर कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून कधीपासून आवर्तन सोडायचे, ...

Kukdi's decision only after the Pimpalgaon Joge cycle | पिंपळगाव जोगेच्या आवर्तनानंतरच कुकडीचा निर्णय

पिंपळगाव जोगेच्या आवर्तनानंतरच कुकडीचा निर्णय

श्रीगोंदा : पिंपळगाव जोगे धरणातील आवर्तन २ मेपर्यंत पूर्ण करायचे आणि त्यानंतर कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून कधीपासून आवर्तन सोडायचे, हा निर्णय घेतला जाणार आहे. तसा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील कुकडी कालवा सल्लागार समितीची ऑनलाईन बैठक झाली. बैठकीस खासदार डॉ. सुजय विखे, खासदार अमोल कोल्हे, आमदार बबनराव पाचपुते, अतुल बेनके, नीलेश लंके, रोहित पवार, माजी आमदार राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार, कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे, प्रशांत कडुसकर, आदी उपस्थित होते.

अतुल बेनके म्हणाले, पिंपळगाव जोगे धरणाचे आवर्तन अगोदर करणे आवश्यक आहे. कुकडीचे पुढील आवर्तन होणार नाही यावर मागील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. त्यावर बबनराव पाचपुते म्हणाले, मागील बैठकीत तसा निर्णय झाला; मग ही बैठक कशासाठी घेतली? पिंपळगाव जोगे व डिंभे धरणांतून पाणी सोडून कुकडीचे आवर्तन करावे लागेल, असे त्यांनी सुचविले. त्यावर आमदार रोहित पवार, राहुल जगताप, घनश्याम शेलार यांनीही शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी केली.

पिंपळगाव जोगेचे आवर्तन अगोदर पूर्ण करून नंतर पिंपळगाव जोगे, माणिकडोह, डिंभे धरणातील पाणी येडगाव धरणात एकत्र करून कुकडीचे आवर्तन सोडून उभ्या पिकांना कशा पद्धतीने देता येईल, याचे नियोजन केले जाणार आहे. येडगावचे आवर्तन मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुटणार, असा दावा काही नेत्यांनी केला आहे. मात्र त्यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत एक बैठक होण्याची शक्यता आहे.

--

घोड नदीवरील बंधारे भरणार

घोडनदीवरील पाच-सहा बंधारे भरण्यासाठी घोड धरणातून शनिवारपासून (दि. १०) पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे बोरी, काटे शिरसगाव, वांगदरी, हंगेवाडी, काष्टी, सांगवीचा बंधारा भरण्यास मदत होणार आहे. याबाबतच्या सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.

--

०९ कुकडी

कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीप्रसंगी जलसंपदामंत्री जयंत पाटील, आमदार रोहित पवार, माजी आमदार राहुल जगताप, अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Kukdi's decision only after the Pimpalgaon Joge cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.