कामगार आयुक्तांनी रेल्वे कामगारांच्या दरवाढीसंदर्भात मागविला अहवाल

By साहेबराव नरसाळे | Published: June 23, 2023 03:54 PM2023-06-23T15:54:17+5:302023-06-23T15:55:37+5:30

आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला होता प्रश्न

Labor Commissioner calls for report on rate hike for railway workers; The question was raised by Thorat | कामगार आयुक्तांनी रेल्वे कामगारांच्या दरवाढीसंदर्भात मागविला अहवाल

कामगार आयुक्तांनी रेल्वे कामगारांच्या दरवाढीसंदर्भात मागविला अहवाल

साहेबराव नरसाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: रेल्वे मालधक्क्यावरील कामगारांच्या मजुरी, वारई दरवाढीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ही दरवाढ मिळावी यासाठी  राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी  राज्याचे कामगार आयुक्त सतीश देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर आयुक्तांनी नगरचे सहाय्यक कामगार आयुक्त तथा अहमदनगर माथाडी व असंघटित कामगार मंडळाचे अध्यक्ष नितीन कवले यांच्याकडून दरवाढी अंमलबजावणीबाबत अहवाल मागविला आहे.

शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे माथाडी कामगार दरवाढीसाठी लढा देत आहेत. मागील महिन्यात काळे यांच्या नेतृत्वाखाली कामगार नेते विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, किशोर ढवळे, सुनील नरसाळे, विजय कार्ले, जयराम आखाडे यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त देशमुख यांची मुंबईतील कामगार भवनात भेट घेत चर्चा केली होती. त्यानंतर आ.थोरात यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने आयुक्तांना सूचना केल्या होत्या. काळे म्हणाले, मागील सुमारे तीन वर्षांपासून सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा दरवाढीचा फरक कामगारांना हुंडेकरी ठेकेदारांनी अदा केलेला नाही. कामगार अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये मालधक्क्यावर जीव धोक्यात घालून काम करत असतात. मध्यंतरी एका कामगाराचा काम करत असताना अपघाती मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतरची मदतही अद्याप मयत कामगाराच्या वारसांना मिळालेली नाही. अशा परिस्थितीमध्ये ठेकेदार यांनी गोरगरीब कामगारांचे कोट्यावधी रूपये थकवले आहेत. ते कामगारांना मिळवून देण्यासाठी आ. थोरात यांच्या माध्यमातून शहर जिल्हा काँग्रेस कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे.

कामगार नेते विलास उबाळे म्हणाले, मंडळाचे अध्यक्ष कवले यांनी कामगारांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. वास्तविक पाहता वसुली संदर्भात कारवाई सुरू करून दोन महिने उलटले आहेत. आता स्वतः राज्याच्या आयुक्तांनी देखील अहवाल मागविला आहे. त्यामुळे मंडळाने विनाविलंब वसुली करण्यासाठी कठोर पावले उचलावीत.

Web Title: Labor Commissioner calls for report on rate hike for railway workers; The question was raised by Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.