चिक्की पुरवठादाराला प्रयोगशाळेचा अहवाल अमान्य
By Admin | Published: August 13, 2015 11:05 PM2015-08-13T23:05:24+5:302015-08-13T23:12:43+5:30
अहमदनगर : अंगणवाडीतील बालकांना पुरवठा करण्यात आलेली राजगिरा चिक्की खाण्यास अयोग्य असल्याचा अहवाल अन्न, औषध विभागाच्या प्रयोगशाळेने दिला होता.
अहमदनगर : अंगणवाडीतील बालकांना पुरवठा करण्यात आलेली राजगिरा चिक्की खाण्यास अयोग्य असल्याचा अहवाल अन्न, औषध विभागाच्या प्रयोगशाळेने दिला होता. त्यानुसार नगरच्या अन्न, औषध प्रशासन विभागाने चिक्कीचा पुरवठा करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील सूर्यकांता महिला उद्योग संस्थेला नोटीस पाठवून लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले. दोन दिवसांपूर्वी पुरवठादार संस्थेने चिक्की नमुन्यांचा अहवाल अमान्य असून त्याची पुनर्तपासणीची मागणी केली आहे.
राजगिरा चिक्कीतील कचकच उघड झाल्यानंतर नगरच्या अन्न औषध प्रशासन विभागाने २९ जून ला नगर प्रकल्प कार्यालयातून तीन ठिकाणाहून चिक्कीचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. तसेच ८४ हजार चिक्कीची पाकिटे जप्त करून ठेवली होती. आजही ही पाकिटे अन्न, औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात आले. अन्न, औषध विभागाच्या प्रयोगशाळेतून चिक्की खाण्यास अयोग असल्याचा अहवाल आल्यानंतर सहाय्यक आयुक्त बी.बी. भोसले यांनी पुरवठादार कंपनीला नोटीस देऊन त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत १५ आॅगस्टला संपणार होती.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुरवठादार सूर्यकांता संस्थेकडून अन्न, औषध विभागाच्या प्रयोगशाळेचा अहवाल अमान्य असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे नगरच्या अन्न, औषध विभागाकडे सादर केले असल्याचे भोसले यांनी सांगितले. यामुळे नियमानुसार आता चिक्कीच्या नमुन्यांची केंद्रीय प्रयोगशाळेतून तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)