शिक्षण विभागात पटपडताळणी शिबिरात नियोजनाचा अभाव
By चंद्रकांत शेळके | Published: June 13, 2023 09:42 PM2023-06-13T21:42:28+5:302023-06-13T21:43:51+5:30
शिक्षक भारतीचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
अहमदनगर: दरवर्षी माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यार्थी संख्येची पटपडताळणी केली जाते. परंतु यंदाच्या पटपडताळणी शिबिरात शिक्षण विभागात नियोजनाचा अभाव असल्याने शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्यांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे ही पटपडताळणी शिबिरे तालुकास्तरावर आयोजित करावीत, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागाच्या विद्यार्थी संख्येचे पटपडताळणी शिबिर १२ ते १६ जूनदरम्यान जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात आयोजित केलेले आहे. शिक्षण विभागाचे सहायक उपनिरीक्षक हे शिबिर घेत आहेत. परंतु शिक्षण विभागाच्या नियोजनाच्या अभावामुळे पट पडताळणी शिबिराचा बोजवारा उडाला आहे. मुळात विद्यार्थी संख्येनुसार पटपडताळणी शिबिर हे वर्षाच्या सुरुवातीलाच घेणे गरजेचे आहे.
आता या शिबिरासाठी प्रत्येक तालुक्यातून प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थेट नगरला शिक्षण विभागात यावे लागत आहे. यात अकोलेसारख्या दीडशे किलोमीटर अंतराहून शिक्षक येत आहेत. परंतु पटपडताळणी करणाऱ्या सहायक उपनिरीक्षकांच्या कार्यालयात शिक्षकांना बसण्यासाठी जागा नाही. त्यांना ताटकळत उभे राहावे लागते.
शिबिरात येणाऱ्या त्रुटी पूर्तता देखील करता येत नाहीत. एका दिवसात तालुक्याची पटपडताळणी होत नसल्याने चकरा माराव्या लागतात. त्यामुळे सर्वांच्या सोयीनुसार ही शिबिरे तालुकास्तरावर घ्यावीत, अशी मागणी संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष रामराव काळे, सचिव महेश पाडेकर, सल्लागार कैलास राहणे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, उपाध्यक्ष सचिन जासूद, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, महिला राज्याध्यक्ष रूपाली कुरुमकर, अमोल चंदनशिवे आदींनी केली आहे.