कर्जबुडव्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे पद धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 03:29 PM2018-06-20T15:29:49+5:302018-06-20T15:30:30+5:30
जिल्हा परिषदेने कर्ज बुडविणाऱ्या ग्रामपंचायतींची यादी जाहीर केली असून, दहा वर्षांहून अधिक काळ कर्ज थकविणाºया ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे.
अहमदनगर : जिल्हा परिषदेने कर्ज बुडविणाऱ्या ग्रामपंचायतींची यादी जाहीर केली असून, दहा वर्षांहून अधिक काळ कर्ज थकविणाºया ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे.त्यामुळे कर्जबुडव्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे पद धोक्यात असल्याची चर्चा आहे.
ग्रामविकासाचा निधी सदर ग्रामपंचायतींकडे अडकल्याने अन्य ग्रामपंचायतींना कर्ज देणे कठीण झाले.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कर्ज बुडविणा-या ग्रामपंचायतींचा मुद्दा सदस्यांकडून उपस्थित केला गेला होता.त्यामुळे ग्रामपंचायत विभागाने दहा वर्षांत कर्जाची परतफेड न करणा-या ग्रामपंचायतींची माहिती घेतली असता जिल्ह्यातील २३ ग्रामपंचायतींकडे १ कोटी २३ लाख ८८ हजार ९०३ रुपयांचे कर्ज थकल्याची माहिती समोर आली.
कर्ज थकविल्याने सदर ग्रामपंचायतींना नोटिसा बजावण्यात आल्या असून, कर्ज बुडविणाºया ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर केला जाणार आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते थकलेल्या ग्रामपंचायतींच्या पदाधिका-यांचे धाबे दणाणले आहेत. पूर्वीचे पदाधिकारी पायउतार होऊन नवीन पदाधिकारी आले. पण, त्यांनी कर्ज फेडले नाही.
जिल्हा परिषदेकडून घेतले कर्ज
जिल्हा परिषदेकडे ग्रामविकास निधी असतो़ या निधीतून जिल्हा परिषद ग्रामपंचायतींना कर्जवाटप करत असते़ जिल्ह्यातील २३ ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेकडून १ कोटी २३ लाखांचे कर्ज घेतले. त्यातून गावात सुविधाही निर्माण केल्या गेल्या.परंतु, जिल्हा परिषदेच्या कर्जाचे हप्ते भरले नाहीत. दहा वर्षे उलटूनही वरील ग्रामपंचायतींनी कर्ज भरलेच नाही.
हजारे यांच्या ग्रामपंचायतीने थकविले १ लाख ९० हजार
पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी ग्रामपंचायतीने १ लाख ९० हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यांनीही हे कर्ज भरले नाही. विशेष म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या गावातच हा प्रकार घडला आहे. आपधूप ग्रामपंचायतीने शौचालय बांधण्यासाठी २००५ मध्ये एक लाखाचे कर्ज घेतले. गेल्या दहा वर्षांत सदर ग्रामपंचायतीने ६ हजार रुपये परत केले. कर्जाचा पहिला हप्ता भरला. त्यानंतर हप्तेही भरले नाहीत. बहुतांश ग्रामपंचायतींनी सन २००० पूर्वी कर्ज घेतलेले आहे.
कर्ज बुडविणा-या ग्रामपंचायती
नगर तालुका : देऊळगाव सिद्धी- ७५ हजार, फकिरवाडा- ६ लाख १४ हजार ४४४, पारगाव मौला- १ लाख ७ हजार, केडगाव -२ लाख ३० हजार, वाळकी- ८लाख ६३ हजार
पाथर्डी तालुका : टाकळी मानूर-३ लाख ७५ हजार
श्रीरामपूर तालुका : टाकळीभान- ७ लाख
कर्जत तालुका : कोंभळी- १ लाख ६० हजार, निमगाव गांगर्डा- ५ लाख ४० हजार, बहिरवाडी- ४९ हजार
श्रीगोंदा तालुका : पारगाव सुद्रिक- ११ लाख
राहुरी : कोल्हार बुद्रुक- ४ लाख ७३ हजार, मांजरी- ४ लाख ३० हजार
कोपरगाव : सांगवी भुसार- ५ लाख, येसगाव-२ लाख ६३ हजार, पोहेगाव-१४ लाख ९१ हजार, कोळपेवाडी- १ लाख
नेवासा- सुरेशनगर- ४ लाख
पारनेर : राळेगणसिद्धी- १ लाख ९० हजार, आपधूप-१ लाख
अकोले : शेंडी- ४ लाख ७५ हजार, गणोरे-१० लाख ३० हजार