जिल्ह्यात १४८० अंगणवाड्यांमध्ये नळजोडअभावी पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:37 AM2021-03-04T04:37:01+5:302021-03-04T04:37:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : नगर जिल्ह्यातील १४८० अंगणवाड्यांना पिण्याच्या पाण्याचे नळजोड नसल्याने तेथे पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील १४८० अंगणवाड्यांना पिण्याच्या पाण्याचे नळजोड नसल्याने तेथे पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. सध्या कोरोनामुळे अंगणवाड्या बंद असल्या तरी जेव्हा त्या सुरू होतील, तेव्हा अडचण जाणवणार आहे. त्यामुळे या ठिकाणी नळजोडणी मिळावी, अशी मागणी होत आहे.
नगर जिल्ह्यात एकूण ४८०१ अंगणवाड्या, तर ७५३ मिनी अंगणवाड्या अशा एकूण ५५५४ अंगणवाड्यांचा समावेश आहे. शून्य ते सहा वयोगटांतील बालके, तसेच गरोदर महिला, स्तनदा माता यांना पोषण आहार पुरवण्याचे महत्त्वपूर्ण काम अंगणवाड्यांमार्फत चालते. पोषण आहार शिजवण्यासाठी प्रामुख्याने पाण्याची गरज भासते. एकूण ५५५४ अंगणवाड्यांपैकी १७१३ अंगणवाड्यांमध्ये पूर्वीचेच नळजोड घेऊन पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर गेल्या वर्षी जलजीवन मिशनअंतर्गत आणखी २,३६१ अंगणवाड्यांमध्ये नळजोड घेऊन पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
सध्या कोरोनामुळे मार्च २०२०पासून सर्वच अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे या काळात अंगणवाडीसेविका या बालकांना, तसेच लाभार्थी महिलांना घरपोच पोषण आहार (कच्चा शिधा) देत आहेत. त्यामुळे सध्या तरी पाण्याची अडचण भासत नाही. मात्र अंगणवाड्या सुरू झाल्यावर उर्वरित १४८० अंगणवाडीसेविकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. अंगणवाड्या सुरू होईपर्यंत तेथे नळजोडणीची व्यवस्था करावी, अशी मागणी अंगणवाडीसेविकांमधूनच होत आहे.
------------
पारनेर, पाथर्डीत सर्वांत जास्त नळजोड प्रलंबित
जिल्ह्यातील पारनेर, पाथर्डी, अकोले या तालुक्यांत सर्वाधिक नळजोडणी प्रलंबित आहेत. पाथर्डी १७१, अकोले १५८, पारनेर १८३, जामखेड १०६, नगर ग्रामीण ११७, तर श्रीगोंदा तालुक्यात १२३ अंगणवाड्यांना नळजोडण्या नाहीत. त्यामुळे तेथे पाण्याची मोठी समस्या जाणवते. कोपरगाव तालुक्यात मात्र सर्व २५० अंगणवाड्यांना नळजोड आहेत.
------------
प्रकल्प एकूण अंगणवाड्या नळजोडणी नसलेल्या अंगणवाड्या
अकोले ३४० १५८
राजूर २६२ ८८
संगमनेर १६५ ३
घारगाव १ २३१ २१
घारगाव २ १६६ २
शेवगाव ३२५ १५
कर्जत ३८१ ९९
राहुरी ३६२ २५
श्रीरामपूर २६२ ८३
नेवासा २४८ ८४
वडाळा १९३ २३
जामखेड २७७ १०६
नगर ग्रामीण १९५ ११७
नगर उत्तर २९१ ८८
भिंगार १६९ ४६
पारनेर ४१२ १८३
पाथर्डी २९२ १७१
श्रीगोंदा २६२ १२३
बेलवंडी १५३ ५५
कोपरगाव २५० ०
राहाता ३१८ १०
------------------------------------
एकूण ५५५४ १४८०
----------
फोटो - ०२अंगणवाडी डमी१, २