लेकराची आर्त हाक बापाला ऐकू गेली नाही़; विषाचा प्याला पिऊन त्याने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 04:53 PM2020-02-28T16:53:37+5:302020-02-28T16:54:18+5:30
शेतात राबराब राबणा-या बापाला त्याचा चिमुकला लेक रोज भरल्या डोळ्याने पाहत होता़. बापाचे हेच कष्ट त्याने शब्दबद्ध केल. अन् शाळेत ‘अरे बळीराजा नको करू आत्महत्या’ ही कविता सादर केली. ज्या दिवशी मुलाने कविता सादर केली त्याच रात्री बापाने विष पिऊन आत्महत्या केली.
टाकळी मानूर/कोरडगाव: शेतात राबराब राबणा-या बापाला त्याचा चिमुकला लेक रोज भरल्या डोळ्याने पाहत होता़. बापाचे हेच कष्ट त्याने शब्दबद्ध केल. अन् शाळेत ‘अरे बळीराजा नको करू आत्महत्या’ ही कविता सादर केली. ज्या दिवशी मुलाने कविता सादर केली त्याच रात्री बापाने विष पिऊन आत्महत्या केली. लेकाची आर्त हाक बापाला ऐकायलाच गेली नाही. पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी या गावात घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
मल्हारी बाबासाहेब बटुळे (वय ३१) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतक-याचे नाव आहे़ भारजवाडी येथील हनुमाननगर जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी (दि़.२७) मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी कविता वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मयत मल्हारी यांचा मुलगा प्रशांत हा इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेतो. या कार्यक्रमात प्रशांत याने ‘शेतात कष्ट करूनही तुज्या डोक्याला ताप, आरे बळीराजा नको करू आत्महत्या, पैसे नसूनही शाळेत शिकवता लेकरं, कसे उन्हात करतात. शेती पीक उगवणी मिळतात. पैसे, शेती करुनही तुज्या हाताला फोड आरे बळीराजा नको करू आत्महत्या’ ही कविता सादर करून शेतक-यांची व्यथा आणि वेदना मांडली होती. उपस्थितांनी प्रशांतच्या कवितेचे कौतुक केले. ‘बळीराजा’ आत्महत्या करू नको.. असे आवाहन करणा-या प्रशांतचा आवाज मात्र त्याच्या बापापर्यंत पोहोचला नाही़. प्रशांतचे वडील मल्हारी बटुळे यांनी गुरुवारी रात्री विष पिऊन आत्महत्या केली. कर्जबाजारीपणामुळे मल्हारी यांनी आत्महत्या केल्याची गावात चर्चा आहे.