विहिरीत पडलेल्या लखनला २४ तासाने बाहेर काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 09:48 PM2017-09-19T21:48:56+5:302017-09-19T21:48:56+5:30
कुसडगाव येथील मोलमजुरी करणा-या दाम्पत्यांचे जुळे राम-लखन हे दोघे चार वर्षे वयाची मुले खेळत असताना त्यातील लखन सात परस विहिरीत पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी व प्रशासनाने कसून प्रयत्न केले. पालकमंत्री राम शिंदे यांच्यामुळे धुळे येथील खास शोध पथक (स्कॉड) दाखल झाले. मात्र पथकाच्या हाती मृतदेह हाती लागल्याने गावावर शोककळा पसरली.
जामखेड : तालुक्यातील कुसडगाव येथील मोलमजुरी करणा-या दाम्पत्यांचे जुळे राम-लखन हे दोघे चार वर्षे वयाची मुले खेळत असताना त्यातील लखन सात परस विहिरीत पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी व प्रशासनाने कसून प्रयत्न केले. पालकमंत्री राम शिंदे यांच्यामुळे धुळे येथील खास शोध पथक (स्कॉड) दाखल झाले. मात्र पथकाच्या हाती मृतदेह हाती लागल्याने गावावर शोककळा पसरली.
नितीन व संगीता रणसिंग हे गरीब दाम्पत्य कुसडगाव येथे मोलमजुरी करून उपजीविका करतात. राम व लखन ही त्यांची दोन जुळी मुले. गावात काम मिळत नसल्याने नितीन रणसिंग हे सुरत येथे हमाली करण्यासाठी गेले आहेत. तर पत्नी संगीता ही कुसडगाव येथे मोलमजुरी करून मुलांसह राहते.
सोमवारी संगीता या मुलांसह शेतात मजुरीने कामासाठी होत्या. यावेळी राम व लखन खेळत होते. दुपारी बाराच्या सुमारास खेळता खेळता चिमुकला लखन जवळच्या सात परस तुडुंब भरलेल्या विहिरीत पडला. राम याने त्यास विहिरीपर्यंत पाहिले होते. परंतु तो तेथे दिसेनासा झाला. आईने रामला लखनबद्दल विचारपूस केली. त्यावेळी तो विहिरीत पडल्याची माहिती मिळाली. आईने हंबरडा फोडीत शोधाशोध केली, मात्र लखन दिसून येईना. याची वार्ता कुसडगावात समजली.
गावचे सरपंच दादा सरनोबत, दूध संस्थेचे अध्यक्ष संजय कारले, महादेव कात्रजकर, तुकाराम कात्रजकर, मुकुंद भोगल, संदीपान कार्ले यांनी पट्टीचे पोहणाºयांना फोन केले. अथक प्रयत्न करूनही यश आले नाही.
पोलीस पाटील नीलेश वाघ यांनी तहसीलदार विजय भंडारी, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना बोलावले. त्यांनी पाहणी करून पथकाकडून प्रेत बाहेर काढणे शक्य नसल्याने वरिष्ठांना कळवले. अखेर नीलेश वाघ यांनी पालकमंत्री राम शिंदे यांना मोबाईलवरून घटना सांगितली. शिंदे यांंच्या आदेशावरून धुळे येथील स्कॉडने जामखेड ते धुळे हे अंतर तीनशे किलोमीटर कापत कुसडगावला पोहोचले. पथक येईपर्यंत सरपंच दादा सरनोबत यांनी परांडा (जि. उस्मानाबाद) येथून वॉटरप्रूफ कॅमेरामॅन बोलावला. त्याने मंगळवारी अकराच्या सुमारास विहिरीत कॅमेरा सोडून पाहिला. तेव्हा मुलगा विहिरीच्या तळाशी दिसून आला. दुपारी बाराच्या सुमारास धुळे येथील दहा जणांचे पथक आल्यानंतर त्यांनी लखन यास त्यांच्याकडील आधुनिक असलेले गळ टाकून बाहेर काढले. आई संगीताने मुलाला पाहताच त्यास कवटाळले. लखन जगात नाही. रामला पण भाऊ गेल्याचे दु:ख झाले. वडील नितीन कुसडगावात आल्यानंतर लखनचा अंत्यविधी करण्यात आला.