तमाशासम्राट रघुवीर खेडकर यांच्या फडाला शिर्डीतून लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:21 AM2021-04-27T04:21:35+5:302021-04-27T04:21:35+5:30
यंदा रामनवमीत कार्यक्रम झाला नसला तरी कोरोनामुळे आलेल्या आर्थिक आपत्तीत तमाशा कलावंतांना जगवण्याच्या भूमिकेतून शिर्डीकरांनी ही मदत केली आहे. ...
यंदा रामनवमीत कार्यक्रम झाला नसला तरी कोरोनामुळे आलेल्या आर्थिक आपत्तीत तमाशा कलावंतांना जगवण्याच्या भूमिकेतून शिर्डीकरांनी ही मदत केली आहे.
साईबाबा हयात असताना स्वत: कलावंतांची कदर करायचे व मानधन द्यायचे. श्रीरामनवमी यात्रा कोरोनाामुळे रद्द झाली होती. त्यामुळे श्रीरामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष केशवराव गायके यांच्या वस्तीवर छोटीशी बैठक घेऊन त्यामधे रघुवीर खेडकर यांच्या तमाशाला मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. खेडकर गेल्या चार-पाच वर्षांपासून कधीही मानधनाबाबत रक्कम ठरवित नाहीत. दिलेली रक्कम बाबांचा प्रसाद म्हणून स्वीकारतात. ते निस्सीम साईभक्त आहेत. नुकतेच एका चॅनलवर त्यांची व्यथा व हालअपेष्टा ऐकल्याने सर्वांच्या सहमतीने निर्णय घेण्यात आला की, रामनवमी यात्रेतील मागील वर्षापूर्वीच्या शिल्लक रकमेतून एक लाख देण्याचे ठरले.
त्याप्रमाणे रविवारी सायंकाळी खेडकर यांना यांच्याकडे ही रक्कम देण्यात आली. यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष केशवराव गायके, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, शिवसेना नेते कमलाकर कोते, खजिनदार बाळासाहेब लुटे व प्रमोद गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर आदी उपस्थित होते.