पाच दिवसानंतर धावली ‘लालपरी’; नगर विभागाचे २ कोटी ५० लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 05:30 PM2017-10-21T17:30:40+5:302017-10-21T17:34:06+5:30
बसेस सुरु होताच बसस्थानकांमधील गर्दी वाढू लागली. बस सुरु झाल्याची माहिती मिळताच शहरातील माळीवाडा बसस्थानकात भाऊबिजेसाठी जाणा-या भगिनींची मोठी गर्दी झाली. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी आगार व्यवस्थापकांनी दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती.
अहमदनगर : न्यायालयाच्या आदेशानंतर एस. टी. महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेला बंद पाचव्या दिवशी मागे घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाच दिवसानंतर एस. टी. बस धावू लागली. दरम्यान बंदच्या काळात महामंडळाच्या नगर विभागाचे तब्बल दोन कोटी ५० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. तर जे कर्मचारी संपात सहभागी होते, त्यांची बिनपगारी रजा लावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
एस. टी. महामंडळाच्या कर्मचा-यांनी विविध मागण्यांसाठी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. जिल्ह्यातील ११ आगारांमधील ६५० बसेसला बे्रक लागला होता. त्यामुळे दिवाळीच्या सणाला जाणारे-येणा-या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. तर ग्रामीण भागातील हक्काचे प्रवासी वाहन असलेल्या लालपरीला बे्रक लागल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे हाल झाले. काही ठिकाणी खासगी वाहनांचा आधार लोकांनी घेतला तर काही ठिकाणी खासगी वाहनेही उपलब्ध नसल्यामुळे ऐन सणासुदीत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. संपादरम्यान खासगी वाहतुकीचेही दर वाढविण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ बसली़ एकीकडे प्रवाशांना मोठी झळ सहन करावी लागली असतानाच महामंडळालाही २ कोटी ५० लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संपाच्या काळातील चालक-वाहकांच्या रजा गृहित धरण्यात येणार असून, या रजाही बिनपगारी लावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
शनिवारी (दि. २१) पहाटेपासून महामंडळाच्या तारकपूर आगारातून लांबपल्ल्याची गाड्या सोडण्यात आल्या. तर तालुकास्तरावरील आगारातून स्थानिक बसगाड्या सोडण्यात आल्या. बसेस सुरु होताच बसस्थानकांमधील गर्दी वाढू लागली. बस सुरु झाल्याची माहिती मिळताच शहरातील माळीवाडा बसस्थानकात भाऊबिजेसाठी जाणा-या भगिनींची मोठी गर्दी झाली. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी आगार व्यवस्थापकांनी दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती.