राष्ट्रवादी युवक काँग्रेससचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 02:05 PM2018-03-28T14:05:39+5:302018-03-28T14:15:49+5:30
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दोन कोटी रोजगार, आरक्षण अशी पोकळ आश्वासने देऊन मोदी सरकारने लोकांची फसवणूक केल्याचा आरोप यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केला.
अहमदनगर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दोन कोटी रोजगार, आरक्षण अशी पोकळ आश्वासने देऊन मोदी सरकारने लोकांची फसवणूक केल्याचा आरोप यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केला.
राष्ट्रवादीच्यावतीने नगरमध्ये आज दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर युवक आक्रोश मोर्चा काढण्यात आला़ युवकांची बेरोजगारी, नोटाबंदीनंतर हिरावलेले गेलेले जॉब, आरक्षण अशा विविध प्रश्नांवर तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश करीत सरकारचा निषेध केला. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार संग्राम जगताप, कैलास वाकचौरे, विठ्ठल लंघे, कपिल पवार, संग्राम कोते, अभिषेक कळमकर यांनी केले.
प्रारंभी सावेडीत येथून वाकळे यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढली. ही रॅली आयुर्वेद चौकात गेल्यानंतर तेथून आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते पोहोचले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.