पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गासाठी जमिनीचे संपादन ; अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांसोबत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 06:48 PM2021-05-18T18:48:20+5:302021-05-18T18:52:24+5:30
मंगळवारी (दि.१८) संगमनेर तालुक्यातील पठार भागातील नांदूर खंदरमाळ आणि खंदरमाळवाडी येथे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करत शेतकऱ्यांसोबत रेल्वे अधिकाऱ्यांची पहिली बैठक पार पाडली.
संगमनेर/घारगाव : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गासाठी पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यातील जमीन संपादित करण्यात येणार आहे. जमीन संपादित करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, मंगळवारी (दि.१८) संगमनेर तालुक्यातील पठार भागातील नांदूर खंदरमाळ आणि खंदरमाळवाडी येथे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करत शेतकऱ्यांसोबत रेल्वे अधिकाऱ्यांची पहिली बैठक पार पाडली.
सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी, महारेलचे उपमहाव्यवस्थापक सोमनाथ गुंजाळ, अभियंता नीलेश खांडगे, सहायक जमीन भूसंपादन अधिकारी सचिन काळे, तलाठी के. बी. शिरोळे, नांदूर खंदरमाळचे सरपंच जयवंत सुपेकर, खंदरमाळवाडीचे सरपंच शिवाजी फणसे आदी यावेळी उपस्थित होते. संगमनेर तालुक्यात पुणे-नाशिकदरम्यान नव्या दुहेरी, मध्यम द्रुतगती ब्रॉडगेज लाईनचे विद्युतीकरणासह बांधकामासाठी खासगी जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. खासगी वाटाघाटीने तसेच थेट खरेदी पद्धतीने व्यवहार करण्यात येणार आहे. नांदूर खंदरमाळ आणि खंदरमाळवाडी येथील जमीन संपादित करण्यासंदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आल्याचे सहायक जमीन भूसंपादन अधिकारी काळे यांनी सांगितले.
महारेलच्या अधिकाऱ्यांनी नांदूर खंदरमाळ आणि खंदरमाळवाडी येथील शेतकऱ्यांसोबत पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी चर्चा केली आहे.
- के. बी. शिरोळे, तलाठी, नांदूर खंदरमाळ, खंदरमाळवाडी, ता. संगमनेर