सावकाराने घेतलेली जमीन मिळाली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:23 AM2021-09-27T04:23:18+5:302021-09-27T04:23:18+5:30
कर्जत : ‘मला माझे पैसे दे, नाहीतर तुझी जमीन माझ्या नावावर करून दे’ असा सावकाराने तगादा लावला. परंतु, रक्कम ...
कर्जत : ‘मला माझे पैसे दे, नाहीतर तुझी जमीन माझ्या नावावर करून दे’ असा सावकाराने तगादा लावला. परंतु, रक्कम दिल्यानंतर माझी जमीन पुन्हा नावावर करून द्यावी लागेल, या बोलीवर एक एकर जमीन सावकाराच्या नावावर करूनही दिली. गेल्या वर्षभरापासून तक्रारदार पैसे देण्यास तयार असतानाही मानसिकता बदललेला सावकार जमीन माघारी देण्यास तयार नव्हता. आता या सावकाराची मानसिकता कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादवांमुळे जागेवर आली असून त्याने आपल्या नावे करून घेतलेली जमीन पुन्हा तक्रारदाराला परत करून दिली आहे.
तालुक्यातील वडगाव तनपुरा येथील बाळासाहेब पांडुरंग भोगे या शेतकऱ्याने एका सावकाराकडून २०१७ साली २ लाख ५० हजार रुपये अडीच रुपये टक्के प्रतिमहिना व्याजदराने घेतले होते. मात्र भोगे यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे ही रक्कम सावकाराला देता आली नाही. सावकाराने ‘माझे पैसे दे नाही तर तुझी जमीन माझ्या नावावर करून दे’ असा तगादा लावला. त्यानंतर नाईलाजास्तव बाळासाहेब भोगे यांनी ‘पैसे दिल्यानंतर माझी जमीन मला परत देण्यात यावी’ या बोलीवर एक एकर जमीन सावकाराच्या नावे करून दिली. सावकार त्यातील उत्पन्न घेत होता. परंतु मागील वर्षापासून बाळासाहेब पांडुरंग भोगे हे सावकाराकडून घेतलेली पूर्ण रक्कम देण्यास तयार असूनही सावकार जमीन परत देण्यास नकार देत होता. ‘मला जमीन विकायची आहे, तुला जर हवी असेल तर आजच्या बाजारभावाप्रमाणे पैसे द्यावे लागतील तरच मी तुला ती जमीन परत देईन’ असे सावकार म्हणत होता. संबंधित जमिनीची आजच्या बाजारभावाप्रमाणे एकरी ९ ते १० लाख रुपये किंमत होत असल्याने एवढी रक्कम देणे फिर्यादीस शक्य नव्हते. वैतागलेल्या बाळासाहेब पांडुरंग भोगे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्व हकीगत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना सांगितली. यादव यांनी सर्व घटना समजून घेत सावकाराला बोलावून घेतले. त्याला समजावून सांगिल्यानंतर अडीच लाख रुपये मुद्दलाची रक्कम घेऊन एक एकर जमीन परत देण्यास त्याने होकार दिला. सावकाराने फिर्यादीची जमीन पुन्हा त्यांच्या नावावर करून दिली आहे.