बियाण्याच्या दरात मोठी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:29 PM2019-06-26T12:29:25+5:302019-06-26T12:48:02+5:30
तालुक्यात काही भागात मागील दोन तीन दिवसात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने सरासरी १४४.६६ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
रोहित टेके
कोपरगाव : तालुक्यात काही भागात मागील दोन तीन दिवसात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने सरासरी १४४.६६ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे बियाण्यांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर चांगलीच गर्दी झाली आहे. परंतु सर्वच बियाणे खास करून मका बियाणाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ऐन दुष्काळात शेतक ऱ्यांच्या
खिशाला चांगलाच आर्थिक फटका बसत आहे.
कोपरगाव शहरात व तालुक्यात नोंदणीकृत १३५ कृषी सेवा केंद्र आहेत. त्यामध्ये सध्या भारतीय व बहुराष्ट्रीय ५० ते ६० कंपन्यांचे बियाणे उपलब्ध आहेत. मका व कपाशीमध्ये ५० ते ६० कंपन्यांचे प्रत्येकी ५ ते ६ वाण, सोयाबीनचे १५ ते १६ वाण, बाजरी १० वाण, तूर, मूग ३ ते ४ वाण उपलब्ध आहेत.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन, बाजरी, तूर, मूग यांच्या दरात प्रति पॅकेट ५० ते १०० रुपयाची तर मका बियाणाच्या प्रति पॅकेट मागे २०० ते ३०० रुपयाची वाढ झाली आहे. तर कपाशीच्या बियाणांवर शासनाने नियंत्रण आणल्याने भाव स्थिर आहेत. मात्र मका बियाणे विक्री करणा-या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बियाणे तसेच कीटकनाशके यांचे
दर विक्रेत्यांना निश्चित करून दिलेल्या दराच्या खाली विक्री
केल्यास विक्रीसाठी दिलेले बियाणे उचलून नेऊ, असे
काही दुकानदारांकडून सांगण्यात आले आहे.
दुकानदारांना त्याच दरात विक्री करावी लागत असल्याने या कंपन्यांची एक प्रकारची मनमानीच म्हणावी लागेल .
असे आहेत प्रति पॅकेटचे दर
सोयाबीन ३० किलोच्या बॅगसाठी -१८०० ते १८५०
मका ४ किलोच्या पॅकेटसाठी १२०० ते १८००
बाजरी दीड किलोच्या पॅकेटसाठी ४५० ते ५३०
तूर २ किलोच्या पॅकेटसाठी ३२० ते ३५०
मूग १ किलोच्या पॅकेटसाठी १८० ते २२५
तंत्र कपाशीचा प्रति ४५० ग्रॅम पॅकेट ७३० रुपये असे दर आहेत.
शासनाने कपाशीप्रमाणेच खासगी कंपन्यांच्या मकासह इतर सर्वच बियाणांच्या दरावर नियंत्रण आणावे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होणार नाही. शेतकºयांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळी पिके घ्यावी जेणेकरून उत्पादित मालाला चांगला भाव मिळेल. शेतकºयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा . - आबासाहेब भोकरे, संचालक, अंकुर कृषी सेवा, कोपरगाव.
बियाणे कंपन्यांनी त्यांचे दर निश्चित केले हा त्यांचा खासगी विषय आहे. परंतु निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दरात शेतकºयांना बियाणे विक्री केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. - पंडित वाघेरे, कृषी अधिकारी, कोपरगाव.
यंदा बियाणे, खताचे, मजुरीचे भाव चांगलेच वाढले आहेत. मागील दोन वर्षापासून सततचा दुष्काळ आहे. सध्या पाऊस पडला आहे. परंतु शेती कशी उभी करायची हीच चिंता आहे. आमचे गाव दुष्काळग्रस्त जाहीर झालेले असताना शासनाकडून एका रुपयाचीही देखील अजून मदत मिळाली नाही. -संतोष सीताराम चव्हाण, शेतकरी,धोत्रे, ता.कोपरगाव.