ओंजळ रिकामी करणारे सरते क्षण... .आणि नावीन्याने भारलेले नवे कोरे मन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:21 AM2020-12-31T04:21:47+5:302020-12-31T04:21:47+5:30

सरत्या वर्षाला निरोप देताना मनाची घालमेल समजता समजत नाही. हिशेब कोणताही असो जमा-खर्च मांडताना त्रास होतोच. या वर्षात वाटेवर ...

The last moments that empty the fingers .... and the new empty mind loaded with innovation .... | ओंजळ रिकामी करणारे सरते क्षण... .आणि नावीन्याने भारलेले नवे कोरे मन...

ओंजळ रिकामी करणारे सरते क्षण... .आणि नावीन्याने भारलेले नवे कोरे मन...

सरत्या वर्षाला निरोप देताना मनाची घालमेल समजता समजत नाही. हिशेब कोणताही असो जमा-खर्च मांडताना त्रास होतोच. या वर्षात वाटेवर आलेल्या अनपेक्षित क्षणांना सावरताना मनाची झालेली चलबिचल डोळ्यांसमोरून काही केल्या जात नाही. ती हतबलता मनाचा तळ शोधणारी. किती रहस्ये दडलेली असतात मनाच्या गाभाऱ्यात. असंख्य भावनांना जखडून ठेवतो आपण. यातल्या किती भावना ओठांवर येतात. राग, लोभ, द्वेष, मत्सर, असूया ही यादी खूप मोठी. या असंख्य भावनांच्या गर्दीत हरवताना स्वतःचेच हसू करून घेण्यातही मीपणा आडवा येतो. अनेकदा प्रयत्न करूनही हाताशी फार काही लागत नाही. हताश चेहऱ्यांमध्ये स्वतःला शोधताना मनाचे सांत्वन करून घेतो. बऱ्याच गोष्टी काळाच्या लाटेवर स्वार होतात. काळाची मात्रा सगळ्याच गोष्टींवर चालणारी.

कधीकधी अपेक्षा नसतानाही आनंदाची फुले आपल्या अंगणात पडत असतात. ती वेचताना मनस्वी सुख मिळते. तो दरवळ फार काळ टिकणारा नसला तरी क्षणिक आनंद देणारा मात्र नक्कीच असतो. खरे तर सुखाच्या व्याख्या व्यक्तिगणिक बदलत जाणाऱ्या. हे सुख जितक्या वेगाने येते तितक्याच वेगाने माघारी फिरते. मात्र, जगण्याची ऊर्मी आणि भिडण्याची ईर्षा आपल्या ओंजळीत टाकून जाते. काहींना तर सुखाचा भर पेलवतही नाही. निरपेक्ष आनंद उपभोगण्यापेक्षा ते क्षण हातातून निसटण्याची भीती जास्त. निसटत्या क्षणांना कुरवाळताना भविष्याची चिंता त्यांना सतावत असते. पेला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा, हे जीवनाचे तत्त्वज्ञान रुजेपर्यंत आयुष्याची संध्याकाळ समोर उभी असते. उद्याची चिंता करीत आजचा वर्तमान खराब करणारे पदोपदी भेटतात. आठवणींच्या हिंदोळ्यावर हेलकावे खाणारे काही कमी नाहीत. खरे तर भविष्यकाळ नसतोच. जगातले एकमेव सत्य हातातला वर्तमान काळ. सगळे काही कळत असूनही काही वळत नाही, हेच खरे जीवन.

सभोवतालेचे रथीमहारथी, सखे-सोबती काळाच्या पडद्याआड झालेले असताना आपण अजूनही पाय रोवून उभे आहोत. नियतीच बोलावणे कधी येईल हे सांगण अवघड. मग आहे ते क्षण यथेच्छ जगण्यासाठी मनाची कवाडे सताड उघडी का ठेवू नये. या धकाधकीच्या आयुष्यात आपण जगणेच विसरलो आहोत. जगाशी तर स्पर्धा करीतच आहोत. मात्र, स्वतःशीही करीत आहोत. या जीवघेण्या स्पर्धेच्या नादात सत्त्व हरवलेली माणसे नुसती धावताहेत कशासाठी, त्यांनाही माहीत नाही.

आज या वर्षाचा शेवटचा दिवस. निरोपाचे काहूर नेहमीप्रमाणे मनाची शांतता ढवळून काढणार. या सरत्या वर्षाला निरोप देताना वर्षभराचा सगळा पट डोळ्यांसमोर फिरतो. कितीतरी नवी माणसे आयुष्यात नव्याने जोडली. जोडलेली किती टिकवली आणि किती माणसे आपल्यापासून दूर गेली. पैशाच्या हिशेबापेक्षा हा कठीण हिशेब. असंख्य घटना या वर्षाने मनावर कोरल्या, कधीच न पुसता येणाऱ्या. कितीतरी कौतुकाचे क्षण वाट्याला आले. कितीतरी यशाच्या क्षणांनी अलगद हुलकावणी दिली. यश हातात आले असे वाटत असताना ते कापरासारखे अलगद उडून जावे. तो भ्रमनिरास वेदनादायक असतो. मनाची समजूत घालताना दमछाक होते खरी; पण तरी आपल्याला पुन्हा उभे राहावे लागो नव्या उमेदीने. जिवाभावाची माणसे अनपेक्षितपणे साथ सोडतात तेव्हा होणारा त्रास शब्दांत न मावणारा. स्वतःला घडविणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. रडविणारे क्षण काही कमी नसतात; पण हसविणारे क्षण चघळणे व रडविणारे क्षण गिळून घेणे, ही कला जमली की मग आयुष्य सुखद होते. या वर्षाची गोळाबेरीज करताना या वर्षाने खूप काही दिले ही भावनाच सुखावणारी. त्यामुळे या वर्षाला निरोप देताना कृतज्ञतेचा कुंभ ओतप्रोत ओसंडून वाहतोय.

व.पु. काळे एका कवितेत म्हणतात,

क्षणोक्षणी चुका घडतात

आणि श्रेय हरवून बसतात

आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला

खूप काही शिकवीत असतात....

जेव्हा आपणच आपला न्यायाधीश होतो, तेव्हा कळते की आपल्या हातूनही खूप चुका झाल्यात. अनेक माणसे कळत-नकळतपणे दुखावली गेली. त्यांचा दुरावा ठळकपणे जाणवतो आहे. ही माणसे आपल्या आयुष्याचा भाग होतील, अशी नव्या वर्षाकडून अपेक्षा. चुकणे शिकणे या दोन्ही गोष्टी अविरतपणे चालू असतात; पण चुकांतून शिकणे आणि तीच चूक पुन्हा न करणे यात खरे शहाणपण असते. हे शहाणपण नवीन वर्षात नक्कीच सोबत करील.

उद्याचा सूर्योदय प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-समाधान घेऊन येवो. या वर्षात प्रत्येकाच्या प्रयत्नांना यश मिळो. प्रत्येकाच्या अंगणात उत्तम आरोग्य नांदो, या सदिच्छांसह नव्या-कोऱ्या वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

…. संतोष दिवे, संगमनेर 9404696142

एम.ए.डी.एड.बी.एड.डी.जे.(पत्रकारिता) पी.एच.डी.(APP)

युवा मराठी साहित्य अभ्यासक

Web Title: The last moments that empty the fingers .... and the new empty mind loaded with innovation ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.