गतवर्षी कोरोनाचा यंदा कुकडी प्रशासनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:20 AM2021-02-07T04:20:20+5:302021-02-07T04:20:20+5:30
आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाला. कुकडी पाटपाण्याच्या आधारावर केलेली रब्बी पिके, कांदा, ऊस आणि फळबागांच्या क्षेत्रात ...
आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यात यावर्षी चांगला पाऊस झाला. कुकडी पाटपाण्याच्या आधारावर केलेली रब्बी पिके, कांदा, ऊस आणि फळबागांच्या क्षेत्रात चांगली वाढ झाली. परंतु, कुकडी पाटपाण्याच्या लांबलेल्या व कमी कालावधीच्या आवर्तनामुळे शेतकरी चांगलाच धास्तावला आहे.
उन्हाच्या झळा वाढत असतानाच विहिरींनी तळ गाठल्यामुळे कुकडी लाभक्षेत्रात लिंबू बागा अडचणीत आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या कोरोनाच्या संकटामुळे तोट्यात गेलेला शेतकरी आता कुकडीच्या फसलेल्या नियोजनामुळे संकटात येण्याची शक्यता आहे.
चांगला पाऊस, तुडूंब भरलेली कुकडीची धरणे तसेच परिसरातील ओव्हरफ्लो झालेल्या तलावांच्या जोरावर यावर्षी शेती हिरवीगार झाली. ऊस आणि गहू या पाणी घेणाऱ्या पिकांबरोबरच शेतकरी फळबागांकडे वळला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात उसाच्या क्षेत्रात एक हजार सातशे हेक्टरने, गव्हाच्या क्षेत्रात दोन हजार तीनशे हेक्टरने तसेच फळबागांच्या ५६० हेक्टरने वाढ झाली.
चारा पिकांच्याही क्षेत्रात चांगली वाढ झाली. कुकडीच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या श्रीगोंदा, चिंभळा, बेलवंडी या महसूल मंडळातील गावांमध्ये सिंचन क्षेत्रात चांगली वाढ दिसते. कुकडीच्या आधारावर गेलेली ही पिके आता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उन्हाचा चटका जसा वाढतो तसा शेतीला पाण्याची गरज वाढते, त्याचा परिणाम पाणी उपस्यावर झाला आहे. उपसा वाढल्यामुळे विहिरी तळ गाठू लागल्या आहेत. आढळगावसह तांदळी दुमाला, टाकळी लोणार परिसरातील शेतकऱ्यांना पाणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
----
लिंबाला चांगला भाव, मात्र पाणीच नाही
कागदी लिंबांचे भाव वाढत चालले आहेत. सध्या ४० रुपये प्रतिकिलाेचा भाव मिळत आहे. मात्र पाणी कमी पडू लागल्यामुळे लिंबू फळ गळती होत आहे. गेले वर्ष कोरोनाच्या संकटामुळे वाया गेल्यामुळे यावर्षी लिंबू फळबागांच्या माध्यमातून चांगल्या अर्थप्राप्तीची अपेक्षा असणारा शेतकरी पाण्याच्या संकटामुळे अडचणीत आला आहे.
ऊस आणि गहू या पाणीदार पिकांबरोबरच फळबागांच्या क्षेत्रात वाढ झाल्यानंतर कुकडीचे पाणी वेळेत आणि मुबलक देण्याचे नियोजन करण्याची गरज होती. परंतु, आता धरणांमध्ये पाणीसाठा असूनही शेतकरी फसलेल्या नियोजनामुळे संकटात येण्याची शक्यता आहे.
-------
श्रीगोंदा तालुक्यातील पीकनिहाय लागवडीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
ज्वारी- २४,२०५
गहू- ९,८२८
हरभरा- ५,९७३
कांदा- २०,१४७
ऊस- ४,९०३
मका - १,०००
चारा पिके- ७,०७९
भाजीपाला-१,४७५
फळबागा- ८०५