राहुरीत तळीरामांवर लाठीचार्ज; तीन दुकानांना ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 02:42 PM2020-05-05T14:42:50+5:302020-05-05T14:44:11+5:30
राहुरी शहरात मंगळवारी (दि.५मे) दुपारी पोलिसांनी तळीरामांवर लाठीचार्ज केल्याने एकच धावपळ उडाली. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचा भंग केला म्हणून राहुरीचे तहसीलदार एफ.आर. शेख यांनी तीन दुकानांना सील ठोकले.
राहुरी : शहरात मंगळवारी (दि.५ मे) दुपारी पोलिसांनी तळीरामांवर लाठीचार्ज केल्याने एकच धावपळ उडाली. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचा भंग केला म्हणून राहुरीचे तहसीलदार एफ.आर. शेख यांनी तीन दुकानांना सील ठोकले. त्यामुळे अर्ध्या तासामध्ये दुकाने बंद करण्याची वेळ दुकान मालकांवर आली.
दारूची दुकाने सुरू होणार म्हणून तळीरामांनी दुकानांसमोर गर्दी केली होती. मात्र मंगळवारी सकाळी दारूची दुकाने उघडली नाही. फिरत्या जिपवरून दारूची दुकाने उघडू नयेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. मात्र अचानक दुपारी दारूची दुकाने उघडली. तीनही दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. फिजीकल डिस्टन्सिंगचा सर्वत्र फज्जा उडाला. याची माहिती तहसीलदार एफ.आर.शेख व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना समजली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील परिस्थिती पाहून तहसीलदार शेख यांनी लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला. त्यानंतर किशोर वाईन्स व सुनील वाइन्स या दोन ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे तळीरामांची एकच धांदल उडाली. क्षणात गर्दी गायब झाली. तहसीलदारांच्या आदेशानुसार किशोर वाईन्स, मोटलानी वाईन सुनील वाईन यांना सील ठोकण्यात आले. बेकायदेशीर दुकान उघडल्याबद्दल तीनही वाईन्स चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद देशमुख यांनी दिली.
राहुरी येथील तीन दुकानांना सील करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केले म्हणून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांनी सांगितले.