लोकमत सखी मंचचा पुढाकार : छत्र हरवलेल्या वधूचं शुभमंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 07:31 PM2018-06-02T19:31:09+5:302018-06-02T19:35:21+5:30
घारगाव येथील येथील लोकमत सखी मंचच्या सदस्या संगीता खामकर व सहका-यांनी पुढाकार घेत पितृछत्र हरवलेल्या वधूचे लोकवर्गणीतून लग्न लाऊन दिले. वधू संध्या कुचेकर आणि वर विनोद चव्हाण यांचा दोन दिवसापूर्वी विवाह निश्चित करत अवघ्या २१ हजारात लग्नसमारंभ पार पडला.
श्रीगोंदा : घारगाव येथील येथील लोकमत सखी मंचच्या सदस्या संगीता खामकर व सहका-यांनी पुढाकार घेत पितृछत्र हरवलेल्या वधूचे लोकवर्गणीतून लग्न लाऊन दिले. वधू संध्या कुचेकर आणि वर विनोद चव्हाण यांचा दोन दिवसापूर्वी विवाह निश्चित करत अवघ्या २१ हजारात लग्नसमारंभ पार पडला.
बेरोजगारी आणि महागाईचा भडका यामुळे जीवन जगणे कसरतीचे झाले आहे. अशा परिस्थितीत खोट्या प्रतिष्ठेसाठी लग्नही शक्तीप्रदर्शनाचा खेळ झाला आहे. या खेळात अनेक कुंटुब कर्जबाजारी झाले आहेत. मात्र या खर्चाला संगीता खामकर यांनी फाटा देत गावातील विवाहसमारंभ पार पाडला. घारगाव येथील स्वर्गीय रमेश कुचेकर यांना सात मुली. त्यामधील चार मुलींचे आई- वडीलांनी मोलमजुरी करुन विवाह केले. पण गेल्या वर्षी रमेश कुचेकर यांचे निधन झाले. कुंटूबाचा सारा भार आई रेखावर आला. या परिस्थितीत संध्याचे हात पिवळे कसे करावेत असा प्रश्न होता.
यावेळी संगीता खामकर मदतीला धाऊन आल्या. त्यांच्यासमवेत अशोक फाजगे, संदीप साठे, सोमनाथ वाघमारे यांनीही साथ देत वधू संध्याचा विवाह शेवगाव तालुक्यातील गरडवाडी येथील महेंद्र चव्हाण यांचे चिरंजीव विनोद यंच्याबरोबर निश्चित केला. घारगाव मधील लोकमत सखी मंच ग्रूपने शुक्रवारी संध्याकाळी हनुमान मंदिरासमोर हा शुभविवाह मोजक्या पाहुण्यांचा उपस्थितीत संपन्न झाला.
विवाहापूर्वी सारिका खामकर, निकिता बांदल, प्रियंका खामकर, प्रतिक्षा जाधव, सविता खामकर, प्रियंका शेलार, सोनाली खंडाळे या युवतींनी वधू -वरांना औक्षण केले. त्यानंतर धान्याऐवजी पाहुण्यांना गुलाब फुलाच्या पाकळ्या अक्षदा म्हणून वाटप केल्या आणि विवाह संपन्न झाला. यावेळी अण्णा थिटे, माजी सरपंच बापू निंभोरे, भुषण बडवे, संजय रायकर, जालिंदर खामकर, शरद खोमणे, संपत कुचेकर, प्रशांत खामकर, सुधीर साबळे यांनी शुभाशीर्वाद दिले. लोकमतचे तालुका प्रतिनिधी बाळासाहेब काकडे यांनी आभार मानले. अग्नीपंख फौंडेशनच्या वतीने भांडी सेट भेट देण्यात आला आण्णा थिटे यांनीही मदत केली.
‘‘ लोकमतने पुढाकार घेतल्यामुळे कुटुंबाची अडचण दूर झाली. आमचे कुंटूंब लोकमत सखी मंच ग्रूपचे खुप आभारी आहे’’- संध्या कुचेकर - चव्हाण , वधू