दूध उत्पादकांचा नेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 03:27 PM2019-08-19T15:27:43+5:302019-08-19T15:27:52+5:30
शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करावयाचे असेल तर शेतीला जोडधंद्याशिवाय पर्याय नाही़ ही बाब त्यांनी जाणली होती़ शेतक-यांच्या या गरजेतूनच त्यांनी कोपरगाव येथे गोदावरी सहकारी दूध उत्पादक संघाची स्थापना केली़ काही वर्षांतच २ लाख लीटर दुधाचे संकलन करून देशभरात वितरण करू लागला़ लाखो शेतक-यांना नवीन व्यवसाय मिळाला तर हजारो मजुरांच्या हाताला काम मिळाले.
अहमदनगर : कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे शेतकरी कुटुंबात १९३३ रोजी नामदेवरावजी परजणे म्हणजेच अण्णा यांचा जन्म झाला. वडील स्व.रखमाजी परजणे पाटील व मातोश्री वेणुबाई यांच्या घराण्यात अनुक्रमे कारभारी, बाबूराव, परभत आणि नामदेवराव ही चार भावंडे आणि छबनबाई व बबनबाई या दोन बहिणी़ परिवारात सुरुवातीपासूनच धार्मिक व सुसंस्कृत वातावरण असल्याने अण्णांच्या मनावर सामाजिक कार्याची जडण-घडण होती. शिक्षण बेताचेच झाल्याने नामदेवराव यांनी शेतीकडेच अधिक लक्ष दिले. संवत्सर परिसरातील त्यावेळच्या तरुण मुुलांच्या मंडळाचे ते प्रमुख बनले. मंडळाचे मित्र मंडळाच्या सामाजिक उपक्रमात त्यांचा अधिकाधिक वेळ जायचा.
शेती व शेतकºयांना त्यावेळीही फारसे चांगले दिवस नव्हते तरी देखील अण्णा शेतीमध्ये रमले. शेतीच्या प्रश्नांत त्यांची जाण आणि जाणीव वाढत गेली. आपल्या गावाजवळच्या संजीवनी (टाकळी) सहकारी साखर कारखान्याची उभारणी होत असल्याचे अण्णांना कौतुक वाटू लागले. संजीवनीचा पहिला धूर बाहेर पडला त्यावेळी त्यांची उत्सुकता अधिकच वाढली. संजीवनीच्या सन १९६३-६४ च्या वार्षिक सभेला ते सामान्य शेतकरी म्हणून गेले. सभेत गोंधळ सुरू झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर ते मध्येच उठले. बांबूच्या कठड्यावर उभे राहिले. कारखाना तुमचा-आमचा आहे. भांडून ओरडून त्याला संपवायचा आहे का? गप्प बसा नाही तर हा कारखाना सरकार ताब्यात घेईल़ नामदेवरावांचा हा आवेश पाहून शेतकरी थंड झाले़ विरोधकांच्या दडपणापुढे कारखान्याचे बोर्ड बरखास्त झाले. कारखान्यावर प्रशासकाची निवड झाली. विठ्ठल बल्लाळ यांनी कारखाना ताब्यात घेतला. कारखान्यावर प्रशासक आल्याने पुढे काय? याची चिंता अनेकांना लागली. कालांतराने प्रशासकांना संजीवनीची निवडणूक घेण्याचा हुकूम आला. निवडणूक लागल्यावर शंकरराव कोल्हे यांनी ज्येष्ठ वकील आर. जी. चिने, ज्येष्ठ कार्यकर्ते दौलतराव होन, आर. एम. पाटील भिंगारे यांच्याबरोबर नामदेवरावांना सोबत घेऊन निवडणुकीची मोर्चेबांधणी केली. अतिशय संघर्षात झालेल्या त्या निवडणुकीत शंकरराव कोल्हे यांचा गट विजयी झाला. त्यावेळी नामदेवराव राजकारणात प्रथमच आले. कारखान्याचे संचालक झाले़ त्यांनी शेतकºयांच्या अडचणीबरोबरच कारखान्याच्या प्रश्नांचाही अभ्यास केला. संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये, चर्चेत ते आक्रमक मुद्दे मांडत़ प्रसंगी शेतकºयांसाठी व्यवस्थापनाशी भांडत़ त्यामुळे शेतकरी वर्गात त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढत गेली. कडक स्वभावामुळे कार्यकर्ते, कारखान्यातील अधिकारी, कर्मचाºयांत नामदेवरावांविषयी आदरयुक्त भीती निर्माण झाली. त्याच कालावधीत गोदावरी कालव्यांचे पाणी कमी पडू लागल्याने शेतकºयांच्या शेतीचे काय? असा प्रश्न भेडसावू लागला. दरम्यान उरळीकांचन (पुणे) येथील बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक स्वर्गीय मणिभाई देसाई यांच्याशी संपर्क आला. कोपरगाव तालुक्यात दुधाच्या रूपाने शेतीला जोडधंदा असावा असा विचार नामदेवराव यांच्या मनात आला. मणिभाई देसाई यांच्याशी या संदर्भात चर्चा सुरू केली. या चर्चेतून सहकारी तत्त्वावरील गोदावरी सहकारी दूध उत्पादक संघ स्थापन करण्याची कल्पना पुढे आली. १९७४ साली दूध संकलनास सुरुवात झाली. जादा दूध देणाºया गाई-म्हशींकडे त्याचा ओढा वाढला. बाहेरच्या राज्यातून दुधाळ गाई-म्हशी कोपरगाव तालुक्यात आणल्या आणि दूध धंद्याला अधिक बळकटी मिळाली. केवळ ७० ते ८० लीटर दुधापासून सुरू केलेल्या या संघाचे संकलन सुमारे २ लाख लीटरपर्यंत करण्यात नामदेवरावांचा फार मोठा वाटा होता. या व्यवसायातून शेतकरी, बेरोजगार तरुण आणि महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. बाजारपेठेतील मार्केटिंगचा त्यांनी अभ्यास केला. दुधापासून उपपदार्थ निर्माण करून त्यांना बाजारपेठ शोधली़ गोदावरी या नावाने दुधाची विक्री मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद या मोठ्या शहरासह राज्याच्या बाहेरही होऊ लागली. संपूर्ण महाराष्टÑभर दूध उत्पादकांचे नेते म्हणून नामदेवरावांची ओळख निर्माण झाली.
दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून नामदेवरावांनी राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार व इतर मोठ्या नेत्यांचे लक्ष वेधले. त्यांनी ३० आॅगस्ट १९८७ रोजी महाराष्टÑातल्या तमाम दूध उत्पादकांचा मेळावा कोपरगाव येथे आयोजित केला़ या मेळाव्यासाठी शरदराव पवार यांच्यासह तत्कालीन माजी केंद्रीय मंत्री कै. अण्णासाहेब शिंदे, महाराष्टÑ राज्य दूध उत्पादक कृती समितीचे त्यावेळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्याच्या माध्यमातून वारणाचे नेते तात्याराव कोरे, शंकरराव मोहिते पाटील यांचेही लक्ष वेधले. नामदेवरावांना त्यांची जबरदस्त साथ मिळाली. गोदावरी दूध संघाच्या वाटचालीत त्यांनी जो आदर्श घालून दिला आहे, त्या आदर्शानुसारच त्यांचे सुपुत्र राजेश परजणे यांचे काम सुरू आहे. नामदेवराव अण्णांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होते. स्वच्छ इस्त्रीचा पांढरा शुभ्र शर्ट, पांढरे शुभ्र धोतर आणि किंचीत तिरपी पांढरी टोपी घातल्यानंतर कमावलेले शरीर असल्याने अण्णांचे व्यक्तिमत्त्व अतिशय प्रभावी रूबाबदार वाटायचे. संजीवनी कारखान्यावर आलेल्या प्रत्येक सभासदाची व इतरांचीही चहा पाण्याची, जेवणाची विचारपूस अण्णा अगत्याने करीत असत. तसेच आलेल्या प्रत्येकाच्या घरच्या वडीलधाºया माणसांची चौकशी करत. मुला-बायांची चौकशी करणे, आलेल्या कार्यकर्त्याला घरी परत जायला वाहन आहे की, नाही याची देखील चौकशी करणारे अण्णा प्रत्येकाला आपल्या घरातील ज्येष्ठ सदस्य वाटत असल्यास नवल नाही.
कोपरगाव तालुक्याने राजकीय, सामाजिक चळवळीतून देशाला दिशा देण्याचे काम केलेले आहे. या तालुक्यात घडलेल्या घटनांचा, येथील नेत्यांचा इतिहास जेव्हा केव्हा लिहिला जाईल, तेव्हा नामदेवराव परजणे अण्णा यांचे नाव त्यात अग्रक्रमावर राहिल हे निश्चित. नामदेवराव अण्णांचे व्यक्तिमत्त्व एका ओळीत सांगायचे तर ‘शांत-संयमी-धीरगंभीर आणि योद्धा’ या चार शब्दांशिवाय ते पूर्णच होऊ शकत नाही.
लेखक : काका कोयटे, अध्यक्ष- महाराष्टÑ राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन