खंडक-यांचा नेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 04:57 PM2019-08-19T16:57:23+5:302019-08-19T16:57:28+5:30
भास्करराव पाटील गलांडे यांच्या आयुष्यातील खंडकरी शेतकºयांच्या चळवळीचे पर्व अत्यंत लक्षवेधी राहिले़ अन्यायग्रस्त खंडकरी शेतकºयांना त्यांच्या मालकीच्या जमिनी शासनाकडून परत मिळाव्यात यासाठी इतर नेत्यांसह भास्करराव यांनी उभारलेल्या लढ्याला यश आले़ १९६९ ला शासनाने खंडकºयांच्या वारसांना चार एकर मर्यादेपर्यंत जमिनी परत करण्याचा निर्णय घेतला.
अहमदनगर : दिवंगत भास्कर पाटील गलांडे यांचा जन्म श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथे २० आॅक्टोबर १९२० रोजी शेतकरी कुटुंबात झाला. तरुण वयात त्यांचा स्वामी सहजानंद भारती यांच्याशी संबंध आला. त्यांना भास्कररावांनी गुरुस्थानी मानले. स्वामी सहजानंद भारती यांच्या सामाजिक कार्याचा मोठा प्रभाव भास्करराव पाटील यांच्या जीवनावर पडला. सन १९५५ च्या सुमारास भाषिक राज्याच्या प्रश्नावरून राज्यात संयुक्त महाराष्ट्र समितीचे आंदोलन भरात होते. विचारांनी कम्युनिस्ट असलेल्या भास्करराव यांना या चळवळीने आकृष्ट केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी महत्वाचे योगदान दिले. या चळवळीच्या माध्यमातून त्यांना राज्यातील मोठमोठ्या नेत्यांचा सहवास लाभला, तसेच जिल्ह्याच्या राजकारणाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. सन १९५७ मध्ये राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. संयुक्त महाराष्ट्र समितीने देदीप्यमान यश मिळवले. या निवडणुकीत भास्कर गलांडे निवडून आले.
सन १९५७ ते १९६२ या काळात त्यांनी तालुक्याचे आमदार म्हणून प्रभावी काम केले. शैक्षणिक विकास, शेतीचा विकास याबाबतची कामे त्यांनी केली. याच सुमारास त्यांचा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी संबंध आला आणि त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन भास्कर बाबांनीही शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले. सन १९५९ मध्ये अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नेतृत्वात खांदेपालट झाला. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती भाऊ बनकर यांच्याकडून माजी आमदार भास्करराव गलांडे यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा आली. निवृत्ती भाऊ बनकर यांनी भक्कम पायाभरणी केली. त्यावर तितकीच दिमाखदार इमारत उभारण्याचे काम भास्करराव गलांडे यांनी केले. सन १९५९ ते सन १९७३ ही १४ वर्षे भास्करराव गलांडे यांनी कारखान्याचे नेतृत्व केले.
सामाजिक जाणिवा असणाºया भास्करराव गलांडे यांची कारखाना हे समाजाच्या विकासाचे माध्यम बनले पाहिजे, अशी धारणा होती. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या साथीने कारखाना कार्यक्षेत्रात त्यांनी शिक्षण क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली. शिक्षणाची मंदिरे उभी करण्याचा त्यांचा ध्यास होता. त्यांच्या काळात श्रीरामपूर, पढेगाव, वडाळा महादेव, अशोकनगर, उंदिरगाव, टाकळीभान, मालुंजा, बेलपिंपळगाव व पाचेगाव येथे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळा कारखान्याच्या आर्थिक सहाय्यातून उभ्या राहिल्या. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळाही तालुक्यातील २० गावांमध्ये उभ्या राहिल्या. त्यांच्या प्रयत्नाने रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून श्रीरामपूर येथे रावबहादूर नारायण बोरावके महाविद्यालय आणि चंद्ररुप डाकले वाणिज्य महाविद्यालय अशी दोन महाविद्यालये उभी राहू शकली. सन १९५७ ते ६२ या कालावधीत भास्करराव गलांडे आमदार होते. राजकीय क्षेत्रातील जिल्ह्याचे नेतृत्व त्यावेळी त्यांच्याकडे होते. आमदारकी आणि कारखान्याचे अध्यक्षपद यांचा अनोखा मेळ त्यांनी समाजाच्या विकासासाठी घातला. प्रशासकाची धमक, दूरदृष्टी आणि सामाजिक प्रश्नांची उत्कृष्ट जाण आणि हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा हे त्यांचे गुणविशेष होते. ते खंडकरी चळवळीचे प्रणेते मानले जातात. कॉम्रेड पी.बी.कडू पाटील ज्यांनी खंडकरी चळवळीचे रणशिंग फुंकले या सेवेची पायाभरणी केली. मोर्चे, आंदोलने आणि तुरुंगवास भोगला. पुढे या चळवळीचे नेतृत्व कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. आज खंडकरी शेतकºयांचा प्रश्न सुटला आहे. यात दिवंगत गलांडे यांचे योगदान अविस्मरणीय असेच म्हणावे लागेल.
भास्करराव यांच्या आयुष्यातील खंडकरी शेतकºयांच्या चळवळीचे पर्व अत्यंत लक्षवेधी असेच म्हणावे लागेल. ब्रिटिश काळात साखर कारखान्यासाठी खंडाने दिलेल्या जमिनी तसेच संपादित जमिनी पुढे सिलिंग कायद्याअंतर्गत सरकारच्या झाल्या. हजारो खंडकरी शेतकरी भूमिहीन झाले. हक्काचे उदरनिर्वाहाचे माध्यम असलेल्या स्वत:च्या जमिनी सरकारी मालकीच्या झाल्याने जमिनी गेल्या. त्यांचे आयुष्यच उदध्वस्त झाले. भास्करराव यांनी खंडकरी शेतकºयांची ही आवश्यकता जाणली. अन्यायग्रस्त खंडकरी शेतकºयांना त्यांच्या मालकीच्या जमिनी परत घेऊन शासनाने या शेतकºयांना न्याय द्यावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. आमच्या बापाच्या जमिनी परत करा, असे बजावत भास्कर बाबांनी चळवळीचे क्रांतिकारी पर्व सुरू केले. मोर्चे, आंदोलनांनी धगधगत्या चळवळीचा प्रारंभ झाला. भास्कर बाबांच्या तडफदार नेतृत्वाला कॉम्रेड पी.बी कडू पाटील आणि सहकाºयांची साथ मिळाली. या चळवळीतील आंदोलनात अनेकदा भास्कर बाबांनी तुरुंगवास भोगला. मात्र भास्कर बाबांनी माघार घेतली नाही. प्रत्येक वेळी ते तुरुंगवासानंतर नव्या उत्साहाने पुन्हा चळवळ उभी करत. या कृतीतून त्यांच्यातील संयमी आणि खंबीर व्यक्तिमत्त्व ठळकपणे पुढे होते. सुमारे वीस वर्ष भास्कर बाबांनी खंडकºयांच्या चळवळीचे नेतृत्व केले. सन १९६९ च्या दरम्यान शासनाने खंडकºयांच्या वारसांना चार एकर मर्यादेपर्यंत जमिनी परत करण्याचा निर्णय घेतला. लढ्याला अंशत: यश मिळालेले होते. शेतकºयांच्या पदरात काही ना काही पडले. मात्र एवढे पुरेसे नव्हते. शेतकºयांचे संपादित सर्व क्षेत्र शेतकºयांना मिळाले पाहिजे तोपर्यंत थांबायचे नाही, असा निर्धार भास्करराव यांनी केला होता. दुर्दैवाने सन १९७२ मधील विधानसभा निवडणुकीत भास्करराव यांचा पराभव झाला. मतदारांनी नाकारताच भास्कर बाबांनी आता आपल्या निवृत्तीची वेळ आली आहे हे जाणले. त्यांनी राजकारणातून अलिप्त होण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली. खंडकरी चळवळीसाठी त्यांनी कॉम्रेड माधवराव गायकवाड यांना विनंती केली. कमलेश गायकवाड यांनी भास्कर बाबांचा आदेश मान्य केला. अशा तºहेने खंडकरी चळवळीचे नेतृत्व सत्तरीच्या दशकात कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांनी श्रीरामपूर मतदारसंघाचीही राजकीय धुरा सोपविण्याचा निर्णय घेतला. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री वसंतरावदादा पाटील यांच्याशी व अन्य नेत्यांशी चर्चा केली. दादांनीदेखील भास्कर बाबांनी नेतृत्व स्वत:कडे ठेवावे असे सुचवले. मात्र जनतेने दिलेला कौल मान्य केला पाहिजे असे सांगत भास्कर बाबांनी दादांना नेतृत्व बदलण्यासाठी राजी केले. वसंतदादा पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी भानुदास मुरकुटे यांना निवडले़ घराणेशाहीच्या काळात आणि शक्य असतानाही भास्कररावांनी राजकीय सूत्रे घरात न ठेवता ती समाजातील शेतकरी कुटुंबातील मुरकुटे यांच्याकडे सोपवली.
लेखक - भास्करराव खंडागळे (सचिव, अशोक साखर कारखाना)