गावातील गटातटाच्या राजकरणापासून नेते अलिप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:24 AM2021-01-16T04:24:34+5:302021-01-16T04:24:34+5:30
अहमदनगर : मतदारसंघावरील पकड कायम ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीची निवडणूक महत्त्वाची असते. मात्र, गावातील गटातटाच्या राजकारणात पडायलाच नको, असे म्हणत तालुक्यातील ...
अहमदनगर : मतदारसंघावरील पकड कायम ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीची निवडणूक महत्त्वाची असते. मात्र, गावातील गटातटाच्या राजकारणात पडायलाच नको, असे म्हणत तालुक्यातील नेते मतदानाच्या दिवशी ग्रामपंचातयींकडे फिरकलेच नाहीत. काहींनी गावांना भेटी न देता पडद्याआडून सूत्रे हलवित समर्थकांना बळ दिले.
जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होते. तालुक्यातील किती ग्रामपंचायतींवर कुणाचे वर्चस्व आहे, यावर नेत्यांचे वर्चस्व ठरत असते; परंतु तालुक्याचे कारभारी, आजी-माजी मंत्री, आजी-माजी आमदार हे मतदान केंद्रांना भेटी देण्यासाठी गावात आले नाहीत. अकोल्याचे आमदार किरण लहामटे यांनी संपर्क कार्यालयातून आढावा घेतला. माजी मंत्री मधुकरराव पिचड हे आजारी असल्याने माजी आमदार वैभव पिचड हे गावांना भेटी देऊ शकले नाहीत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे मुंबईत होते. माजी मंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे हेही मतदारसंघात नव्हते. भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे हे कोपरगाव तालुक्यातील गावांना भेटी देत होते. जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे हे त्यांच्या संवत्सर गावात तळ ठोकून होते. नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे त्यांच्या देवगावात दिवसभर तळ ठोकून होते. मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख हेही या निवडणुकांपासून अलिप्त राहिले. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. भाजपाच्या आमदार मोनिका राजळे पाथर्डी तालुक्यातील निवडणुकांवर लक्ष ठेवून होत्या. शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले हे शेवगाव तालुक्यात फिरले नाहीत. कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार हे बारामतीत होते. पवार यांचे विरोधक भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांनीही गावोगावी भेटी देण्याचे टाळले. भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते हेही गावात फिरले नाहीत.
..
कर्डिले व गाडे यांनी हलविली सूत्रे
भाजपाचे माजी अमदार शिवाजीराव कर्डिले व सेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे हे ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने आमने- सामने आले होते. भाजपाविरोधात बहुतांश ग्रामपंचायतींत महाविकास आघाडी करण्यात आली होती. गाडे व कर्डिले यांनी समर्थकांना बळ देत सूत्रे हलविली. जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले हे त्यांच्या खंडाळा, तर गोविंद मोकाटे हे इमामपूरमध्ये तळ ठोकून होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके हे त्यांच्या खारेखर्जूने येथे, तर जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखेडे हे निंबळक येथे होते.
....
व्याह्यांसाठी धावले महापौर
नवनागापूरचे माजी सरपंच दत्ता सप्रे हे महापौर बाबासाहेब वाकळे यांचे व्याही आहेत. महापौर बाबासाहेब वाकळे हे व्याही दत्ता सप्रे यांच्या मदतीला धावले. वाकळे यांनी मतदानाच्या दिवशी नवनागापूर गावाला भेट दिली. तसेच सेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनीही नवनागापूर येथे भेट दिली.