नेते हायटेक हॉटेलात, कार्यकर्ते भक्त निवासात; मंथन शिबिरातही ‘व्हीआयपी’ कल्चर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 06:52 AM2022-11-05T06:52:55+5:302022-11-05T06:53:09+5:30
विविध आघाडीच्या कार्यकर्त्यांना ‘नो एन्ट्री’
- शिवाजी पवार
शिर्डी (जि. अहमदनगर) : राष्ट्रवादी काँग्रेसचेशिर्डीत मंथन सुरू आहे. पक्षवाढीच्या या मंथन शिबिरातही पक्षातील ‘व्हीआयपी कल्चर’च्या भिंती अभेद्य आहेत. पक्षाने कार्यकर्त्यांची वर्गवारी करून त्यांच्या निवासाची व्यवस्था केली. माजी मंत्री व नेते हायटेक हॉटेल्समध्ये, तर कार्यकर्त्यांना भक्त निवासाचे पासेस देण्यात आले.
दोन दिवसीय मंथन शिबिरासाठी राज्यभरातील दोन हजार पदाधिकारी दाखल झाले आहेत. आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, शहरप्रमुख, तालुकाप्रमुख अशी पत पाहून प्रत्येक पाहुण्याच्या निवासाची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. त्यासाठी भक्त निवासांपासून पंचतारांकित हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत.
शिर्डीतील साई पालखी निवारा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून येथे पदाधिकारी दाखल झाले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आदी प्रमुख नेत्यांसह पक्षाचे आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष शिबिरासाठी आले आहेत. या सर्वांची निवास व्यवस्था पक्षाने केली आहे.
आमदारांचे निवासाचे पासेस स्वीय सहायक घेऊन जात होते. मात्र, इतर पदाधिकाऱ्यांना पास मिळविण्यासाठी रांगेत उभे राहून स्वतःची ओळख व नाव नोंदणीचे सोपस्कार पूर्ण करावे लागले. बडे नेते पंचतारांकित हाॅटेलात, आमदार तारांकित हॉटेलात, जिल्हाध्यक्ष हॉटेलमध्ये, तर तालुकाप्रमुख शिर्डी संस्थानच्या भक्त निवासात अशी निवासाची वर्गवारी आहे.