नेत्यांनो, जनतेला कोरोनाच्या मृत्युशयेवर जाण्यापासून वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:20 AM2021-04-25T04:20:06+5:302021-04-25T04:20:06+5:30

कोपरगाव : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजविला आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येने सर्वत्र गोंधळ माजला आहे. त्यातच कोपरगाव तालुक्यासारख्या ...

Leaders, save the masses from going to Corona's deathbed | नेत्यांनो, जनतेला कोरोनाच्या मृत्युशयेवर जाण्यापासून वाचवा

नेत्यांनो, जनतेला कोरोनाच्या मृत्युशयेवर जाण्यापासून वाचवा

कोपरगाव : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजविला आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येने सर्वत्र गोंधळ माजला आहे. त्यातच कोपरगाव तालुक्यासारख्या ठिकाणी देखील चित्र वेगळे नाही. येथेही बाधित रुग्णांनी हजारी पार केली असून एक-दीड महिन्यात ५० पेक्षा जास्त रुग्णांना उपचारादरम्यान सुविधांच्या अभावामुळे प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोपरगावचे आलटूनपालटून नेतृत्व करणाऱ्या काळे-कोल्हे या नेतेमंडळींनी येथील जनतेला कोरोनाच्या मृत्युशयेवर जाण्यापासून वाचवावे, अशी आर्त हाक कोपरगावकर देत आहे.

एवढ्याही प्रतिकूल परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग आपापल्या परीने रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करीतच आहेत. त्यातच कोपरगाव तालुक्यावर ज्या ज्यावेळी संकटे, आपत्ती, दुर्घटना, महापूर, अतिवृष्टी आली त्या त्यावेळी शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या कोसाका उद्योग समूहाने व संजीवनी उद्योग समूहाने धाव घेत जनतेच्या अनंत संकटांची सोडवणूक करण्यासाठी खमकी भूमिका घेत संकटे परतवून लावलेली आहेत. याचा इतिहास साक्षीदार आहे; परंतु गेल्या वर्षापासून तालुक्यावर आलेल्या संकटात वेगवेगळ्या प्रकारे या समूहांनी योगदान दिलेलेच आहे. मात्र, सद्य:स्थितीत या संकटाने रौद्ररूप धारण केल्याने या संकटाच्या व्यवहारात थेट जनतेच्या मृत्यूचाच सौदा होत असल्याने परिस्थिती कठीण बनली आहे.

याही परिस्थिती मागे न राहता या दोन्ही उद्योग समूहाचे नेतृत्व करणारे काळे व कोल्हे यांच्या तिसऱ्या पिढीतील शिलेदार कोपरगावच्या जनतेसाठी पुढाकार घेऊन त्यांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यानुसार कोसाका उद्योग समूहाचे प्रमुख व तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी ५०० बेडचे कोविड सेंटर उभारले आहे, तर संजीवनी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा तालुक्याचे दुसरे युवा नेते विवेक कोल्हे हे देखील पुढाकार घेऊन ५०० बेडचे कोविड सेंटर उभारत आहेत. ही निश्चितच कोपरगावच्या जनतेसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, कोपरगावसाठी सद्य:स्थितीत जम्बो कोविड हॉस्पिटलची गरज आहे. ज्यामध्ये व्हेंटिलेटर मशीनचे बेड, आयसीयूचे बेड, ऑक्सिजन बेडची संख्या अधिक असणे गरजेचे आहे. यासाठी लागणाऱ्या यंत्रणेसह मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा तसेच स्वतंत्र आरोग्य यंत्रणा असणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच सिटीस्कॅन मशीनची देखील गरज आहे. कारण तालुक्यात सध्या कार्यरत असलेली यंत्रणा बाधित रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अपुरी पडत आहे. त्यातही खासगी हॉस्पिटलच्या माध्यामतून मिळणाऱ्या उपचारातूनदेखील अनेकांचे प्राण वाचत आहे; परंतु जीव वाचविण्यासाठी लागणारा लाखोंचा पैसा प्रत्येकाकडेच नाही हेसुद्धा येथील वास्तव आहे.

त्यामुळे सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देत त्या प्रत्यक्षात अंमलात आणण्याइतके सामर्थ्य नियतीने आपल्यासारख्या नेतेमंडळींना दिलेले आहे. त्याहून देखील महत्त्वाचे आपण मदत करणार आहातच. यामध्ये किंचितही शंका नाही. मात्र, ही मदत पंचवार्षिक योजनेनुसार न होता युद्धपातळीवर केल्या जाणाऱ्या मदतीनुसार व्हावी. कारण या संकटात आपल्याला नागरिकांचे जीव वाचवायचे आहेत. कारण, आजच्या घडीला दिवसागणिक जीव जात आहे.

..........

स्वत:ची यंत्रणा उभी करावी

शासकीय यंत्रणेच्या भरवशावर न राहून वेळ वाया न घालवता स्वतःची स्वतंत्र यंत्रणा उभी करून कोरोनाच्या मृत्युशयेवर असलेल्या कोपरगावच्या जनतेला जीवनदान मिळवून द्या, जेणेकरून हीच जनता तुमच्या पुढील राजकीय रणसंग्रामात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून देत राहील.

Web Title: Leaders, save the masses from going to Corona's deathbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.