महापालिका शाळांच्या अवस्थेबाबत... जाणून घ्या... मान्यवराची मते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 11:07 AM2018-05-24T11:07:05+5:302018-05-24T11:11:10+5:30
महापालिकांच्या शाळांचा दर्जा ‘सुमार’ आहे, हे ‘लोकमत’ने नगरकरांच्या निदर्शनास आणून दिले. महापालिका शाळांच्या सुधारणेबाबत लवकरच एक आराखडा तयार करू. प्रत्येक शाळा ओंकारनगर (केडगाव) येथील शाळेसारखी मॉडेल होईल, याबाबत स्वत: लक्ष घालू. इतर शाळांमध्ये गुणवत्ता सुधारण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना राबविण्यात येतील, अशी ग्वाही महापौर सुरेखा कदम यांनी दिली. ‘लोकमत’ने महापालिकेच्या शाळांबाबत वस्तुस्थिती मांडली आहे.
अहमदनगर : महापालिकांच्या शाळांचा दर्जा ‘सुमार’ आहे, हे ‘लोकमत’ने नगरकरांच्या निदर्शनास आणून दिले. महापालिका शाळांच्या सुधारणेबाबत लवकरच एक आराखडा तयार करू. प्रत्येक शाळा ओंकारनगर (केडगाव) येथील शाळेसारखी मॉडेल होईल, याबाबत स्वत: लक्ष घालू. इतर शाळांमध्ये गुणवत्ता सुधारण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना राबविण्यात येतील, अशी ग्वाही महापौर सुरेखा कदम यांनी दिली. ‘लोकमत’ने महापालिकेच्या शाळांबाबत वस्तुस्थिती मांडली आहे. याबाबत नगरसेवक, अधिकारी यांच्यासोबत लवकरच चर्चा करून शाळांच्या सुधारणाबाबत काय उपाययोजना राबविता येतील, याचा आढावा घेतला जाईल. शैक्षणिक दृष्ट्या खासगी शाळांशी स्पर्धा करू शकतील, अशी शाळांची गुणवत्ता विकसित करण्याची गरज आहे. त्याबाबत निश्चित कार्यवाही करण्याचा प्रयत्न करू, असे महापौरांनी सांगितले.
भूतकरवाडीच्या शाळेची अवस्था अत्यंत वाईट आहे, हे मान्य आहे. शाळेची जागा आणि इमारतही जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. या जागेत काही दुरुस्ती किंवा सुधारणा करायची असेल तर अडचणी येतात. मात्र जिल्हा परिषद प्रशासनासोबत चर्चा करून शाळेला संरक्षक भिंत, छोटासा बगीचा करून शाळा सुंदर करण्याचा प्रयत्न करू. परिसरातील अवैध धंदे हटविण्याबाबत पोलीस प्रशासनालाही पत्र देवून कारवाई करण्याची मागणी करणार आहे. -अनिल बोरुडे, उपमहापौर
महापालिकेच्या शाळांचा प्रशासनाधिकारी म्हणून खरा अधिकार आयुक्तांचाच आहे. शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे. शहरातील खासगी शाळांमध्ये लाख-लाख रुपये भरून प्रवेश घेण्यासाठी गर्दी होते. महापालिकेच्या शाळांमध्ये अद्ययावत शैक्षणिक सुविधा दिल्या, अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण दिले आणि शाळांच्या इमारतीचा चेहरा मोहरा बदलला तर महापालिकांच्या शाळांमध्येही प्रवेशासाठी गर्दी होईल. शिक्षकांनी परिश्रम करून शाळांची गुणवत्ता सुधारणे गरजेचे आहे. प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती गरजेची आहे. बंद पडलेल्या शाळांच्या इमारती महापालिकेने तत्काळ ताब्यात घेण्याची गरज आहे. -बाळासाहेब बोराटे, विरोधी पक्ष नेते
खासगी शाळांना जेवढ्या सुविधा नाहीत, तेवढ्या सुविधा महापालिकेच्या शाळांना दिल्या जातात. जुने सर्व शिक्षक निवृत्त झाले असून नवे शिक्षक तरुण आणि उमेदीने शिकविणारे आहेत. त्यांनी शिकवले नाही तर पटसंख्या कमी होवून त्यांचीच नोकरी धोक्यात येते. त्यामुळे सर्वच शिक्षक गंभीरपणे शिकवित आहेत. सर्व शिक्षा अभियानाच्या अनुदानातून आवश्यक सोयी-सुविधा पुरविल्या जातात. महापालिकेच्या शाळांना मैदाने आणि इमारती आहेत. सर्व काही खासगी शाळांच्या तुलनेत सोयी असताना केवळ लोकांची मानसिकता नसल्याने महापालिकांच्या शाळांमध्ये विद्यार्थी फिरकत नाहीत. काही शाळांच्या इमारती आणि परिसराची दुरवस्था असून त्याकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक इमारती चांगल्या आहेत, मात्र तेथे शाळा नाहीत, अशा इमारतींमध्ये शाळा सुरू करण्यास हरकत नाही. -सतीश धाडगे, माजी सभापती, तत्कालीन महापालिका शिक्षण मंडळ
गेल्या पंधरा वर्षांपासून महापालिकेने शाळेकडे दुर्लक्ष केले आहे़ नगरसेवकांची एक तज्ज्ञ समिती होती़ ती आता अस्तित्वातच नाही़ शिक्षण मंडळ चालविण्यासाठी तज्ज्ञाचे संचालक मंडळ असावे़ त्यात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ असावेत़ अनेक ठिकाणी इमारती योग्य नाहीत़ त्यातून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे़ महापालिकेला जर या शाळा चालविता येत नसतील तर एखाद्या स्वयंसेवी संस्थेला या शाळा चालवायला द्याव्यात़ तेथे चांगल्या सुविधा दिल्या तर गरीब मुलांना दर्जेदार शिक्षण तरी मिळेल़ पालिकेने काही शिक्षण सम्राटांना जागा दिल्या आहेत़ मग ते का नाही पालिकेच्या शाळा चांगल्या पद्धतीने चालवत? शहरातील नागरिकही खासगी शाळांमध्ये हजारो रुपये डोनेशन भरतील़ पण पालिकेच्या शाळा सुधारल्या पाहिजेत, यासाठी आवाज उठवत नाहीत़ चांगल्या उमेदवारांना निवडून देत नाहीत़ सामाजिक भान असलेले चांगले शिक्षित नगरसेवक निवडून दिले पाहिजेत़ ‘लोकमत’ने शहर विकासाचा जागर सुरू केला आहे तो अभिनंदनीय आहे. -शशिकांत चंगेडे, सामाजिक कार्यकर्ते
महापालिकेच्या शाळांची आजची दुरवस्था पाहून मनाला वेदना होत आहे़ मी स्वत: पालिकेच्या शाळेत शिकलो आहे़ माझ्या वर्गात भरपूर संख्या होती. आता गरीब माणूस सुद्धा मुलांना खाजगी शाळेत टाकतो आहे. पालिकेतील शाळेत शिकणारी जी पोरं आहेत, ती गरिबापेक्षा गरिबांची आहेत़ आजूबाजूच्या वस्तीतील आहेत़ त्यांना सुंदर, स्वच्छ वातावरणात शिक्षण दिले तरच ही मुलं मुख्य प्रवाहात येतील़ अन्यथा गुन्हेगार होतील़ आपलीच मुलं आपल्याच समाजात अशांतता पसरवतील. एका बाजूला स्वच्छ भारत अभियान म्हणायचं आणि दुसरीकडे शाळा आणि मुले सडवायच्या हा प्रशासनाचा भंपकपणा आहे. शाळा उदास, शिक्षक उदास त्यामुळे मुले उदास म्हणजे अहमदनगरचे भविष्य उदास़ हे चांगल्या समाजाचे लक्षण नाही. शिक्षणासाठी पालिकेने आर्थिक तरतूद केली पाहिजे़ ही समस्या सोडवण्यासाठी नगरसेवकांना वेळ व समज पाहिजे़ -विठ्ठल बुलबुले, निमंत्रक, दंगलमुक्त अहमदनगर अभियान
महापालिका शाळेपासून पालिकेला काहीच उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे अधिकारी-पदाधिकाºयांना या शाळांच्या प्रगतीत रस असण्याचे कारण नाही. पालिकेतील सत्ताकारण, टेंडरवरुन झालेली भांडणे कायम वाचनात येतात. परंतु कुठल्या सभेत शाळा सुधारण्यासाठी काही चर्चा झाल्याची ऐकिवात नाही. या शाळांमधून गरीब व वंचित मुले शिकतात. पण त्यांना मतदानाचा हक्क नसल्याने नगरसेवकांच्या दृष्टीने या मुलांचे मूल्य शून्य आहे. शाहू, फुले, आंबेडकरांना अपेक्षित पिढी याच शाळांमधून घडते. भाषणात सर्रास या महापुरुषांची नावे घेणाºयांनी तरी या शाळेतील सोयी-सुविधा व मुलांच्या गरजा लक्षात घ्याव्यात. शहराचे पाणी, रस्ते व स्वच्छतेइतकेच महापालिकेने शिक्षणाकडेही लक्ष द्यावे. ज्या शहरात शाळा, वाचनालये व मैदाने समृद्ध असतात, ते शहर सुसंस्कृत म्हणून ओळखले जाते. सत्तेच्या खेळात महापालिकेच्या शाळांचा बळी जाणार नाही, याची काळजी सर्वच राजकारण्यांनी घेतली तर ते गरीब व दीन दलित पालकांवर केलेले शैक्षणिक उपकार ठरतील. -डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते
महानगरपालिकेच्या शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी आमच्या कार्यकाळात विविध उपक्रम राबविले होते. पूर्वी मनपा शाळांना क्रमांक होते. आम्ही सर्व प्रथम मनपाच्या सर्व शाळांना महापुरूषांची नावे देण्याचा ठराव दिला होता. त्यामुळेच माझी शाळा असलेल्या सावेडीतील १७ नंबर शाळेस महात्मा ज्योतीराव फुले मनपा शाळा असे नामकरण केले. या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असल्याने त्यांना गणवेशासह इतर शैक्षणिक साहित्य मिळवून दिले. शाळेसाठी छोटे व्यासपीठ उभारले. मुख्याध्यापिका गायकवाड यांनी खूप परिश्रम घेतले होते. सावेडीच्या मनपा शाळेतील गुणवत्ता व हजेरी इतरांपेक्षा चांगली आहे. -भैरवनाथ वाकळे, माजी नगरसेवक
महापालिकेच्या शाळांकडे प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे़ पदाधिकारी व नगरसेवकांना तर शैक्षणिक विषयाबाबत काहीच स्वारस्य नसल्याचे दिसत आहे़ सरकारी शाळातून दर्जेदार शिक्षण मिळाले तर पालकांना खासगी शाळेत मुले टाकण्याची गरज भासणार नाही़ महापालिकेच्या याच शाळातून अनेक अधिकारी-पदाधिकारी घडले आहेत़ भुतकरवाडीसह महापालिकेच्या सर्वच शाळांची सध्या झालेली दुरवस्था ‘लोकमत’ने मांडून या विषयाला चालना दिली आहे़ आता महापालिकेचे आयुक्त आणि महापौरांनी पुढाकार घेऊन या शाळांची दयनीय अवस्था दूर करणे गरजेचे आहे़ खासगी शाळांचे शुल्क न परवडणारे गरीब विद्यार्थी या शाळांत शिक्षण घेत आहेत़ त्यांच्या भवितव्याचा विचार करून मनपाच्या शाळांची दुरवस्था रोखण्यासाठी सर्वांनी या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे. - डॉ. योगेश चिपाडे,अध्यक्ष, इंद्रायणी प्रतिष्ठान
महापालिकेच्या शाळा उत्तम सोयी-सुविधा, दर्जेदार शिक्षण देण्यात कमी पडत आहेत़ त्यामुळे खासगी शाळांचा बोलबाला वाढत आहे. जनतेचे राहणीमान सुधारत आहे. शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. मात्र, पालिकेच्या शाळा बदलत नाहीत़ आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे, हा पालकांचा हेतू असतो. मात्र, पालिकेच्या शाळा पालकांच्या विश्वासास पात्र ठरत नाहीत़ त्यामुळे इंग्लिश, सेमी इंग्लिश मिडीयम शाळांकडे लोकांचा कल वाढत आहे. पालिकेच्या शाळांनी काळाप्रमाणे बदलणे गरजेचे आहे़ उत्तम मूलभूत सोयी आणि दर्जेदार शिक्षण दिल्यास पालिकेच्या शाळांवर सर्वांचा विश्वास बसेल़ अधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार, नेते मंडळी यांची मुले महानगरपालिकेच्या शाळेत दाखल झाल्यास सर्वांचेच या शाळांकडे बारकाईने लक्ष राहील. -किरण सुपेकर, प्राध्यापक