मुळा नदीकाठी दोन मंत्री तरी बंधारे रिकामेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:21 AM2021-05-11T04:21:14+5:302021-05-11T04:21:14+5:30
मुळा धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे नदीकाठ उजाड झाला ...
मुळा धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे नदीकाठ उजाड झाला आहे. शेती, पिण्याचे पाणी, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी सुटेल या आशेने शेतकऱ्यांना बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये लोकवर्गणीतून जमा केले. मात्र पाणी सुटण्याची आशा धुसर झाल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी त्यांच्या काळात हे बंधारे भरले होते. आता विद्यमान मंत्र्यांकडून शेतीचा महत्त्वाचा पाणी प्रश्न भिजत पडला आहे. या दोन्ही मंत्र्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन हे बंधारे तत्काळ भरावेत, अशी मागणी दत्तात्रय घोलप, कृपाचार्य जाधव, नानासाहेब जुंधारे, शिवाजी जाधव, युवराज पवार, श्रीराम तुवर, विठ्ठल जाधव, ब्रह्मदेव जाधव, विठ्ठल जाधव, दादा राजळे, वैभव जरे, योगेश बनकर, राजू जंगले, विजय जंगले, संतोष नवगिरे, अशोक टेमक, विलास सैंदोरे, भाऊसाहेब विटनोर आदींसह अंमळनेर, करजगाव, पानेगाव, शिरेगाव, खेडले परमानंद, पिंप्री-वळण, चंडकापूर, केंदळ, मानोरी, वळण, मांजरी, आरडगाव आदी गावांमधील शेतकऱ्यांनी हे बंधारे आठ दिवसात भरून द्यावेत, अशी मागणी केली आहे.
..........
आंदोलनाचा इशारा
सध्या मे महिन्याचा कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यामध्ये पिण्याचा प्रश्न, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणांमध्ये पाणीसाठा मुबलक प्रमाणात असूनसुद्धा बंधारे कोरडेठाक का? लवकरात लवकर बंधारे भरून मिळावेत. बंधारे आठ दिवसांच्या आत भरले नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.